आषाढी एकादशी निमित्त बेळगावातील ऐतिहासिक खडेबाजार येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रम पार पडले. पहाटेपासून भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली.


सुमारे ३०० वर्षांचा इतिहास असलेल्या खडेबाजार येथील पानसे बंधूंच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पहाटे साडेचार वाजता श्री विठ्ठल आणि रुक्मिणी यांच्या मूर्तींना जलाभिषेक व महापूजा करण्यात आली. आकर्षक पुष्पसजावटीने सजलेल्या देवतेची महाआरती आणि मंत्रपुष्पांजली अर्पण करण्यात आली. यावेळी देशातील आणि जगातील सर्व नागरिकांच्या सुख, शांती, समृद्धी व उत्तम आरोग्यासाठी श्री पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करण्यात आली.


पहाटेपासूनच विठ्ठल दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. भाविकांनी शिस्तबद्ध रांगेत उभे राहून दर्शन घेतले. मंदिर परिसरात “जय हरी विठ्ठल, ज्ञानोबा तुकाराम” या नामघोषासह भजनांनी भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. भाविकांना सुरळीत दर्शन घेता यावे यासाठी मंदिर समितीने आवश्यक व्यवस्था केली होती.
दर्शनासाठी आलेल्या भाविकांना रिद्धी व्हिजन संस्थेतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. दिवंगत निशा छाब्रिया यांनी सुरू केलेली ही सेवा त्यांच्या निधनानंतरही त्यांचे पती नागेश छाब्रिया सातत्याने पुढे नेत असून, आषाढी एकादशी निमित्त हजारो भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.


Recent Comments