gokak

गोकाक पोलिसांकडून चोरीचा मुद्देमाल मूळ मालकांना हस्तगत

Share

गोकाक ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्या पाच वर्षांत चोरीला गेलेले मोबाईल, पंपसेट आणि दागिने पोलिसांनी शोधून काढले आहेत. बेळगावचे जिल्हा पोलीस प्रमुख (एसपी) के. रामराजन यांच्या हस्ते हा मुद्देमाल मूळ वारसांना परत करण्यात आला.

पोलिस कर्मचाऱ्यांच्या विरोधात ‘केएसपी’ ॲपवर जाणीवपूर्वक तक्रारी केल्या जात असल्याच्या प्रश्नावर एसपी के. रामराजन यांनी स्पष्ट भूमिका घेतली. अवैध धंद्यांना पोलिसांनी पायबंद घातल्यामुळे काही लोक सूडबुद्धीने कर्मचाऱ्यांविरोधात खोट्या तक्रारी करत आहेत. अशा तक्रारींची सत्यता पडताळून पाहिल्यानंतरच योग्य ती कारवाई केली जाईल, असे के. रामराजन यांनी सांगितले.

नागरिकांचे दागिने किंवा मोबाईल चोरीला गेल्यास त्यांनी न घाबरता तातडीने स्थानिक पोलिस ठाण्यात फिर्याद द्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. रायबाग आणि कागवाड तालुक्यात सुरू असलेला मटका व्यवसाय, रेशन तांदळाची तस्करी आणि अवैध दारू विक्रीबाबत माहिती मिळताच कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश एसपींनी दिले आहेत.

गोकाकमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर सावकारी (मीटर व्याज) संदर्भात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. व्याजाच्या नावाखाली मालमत्तांची चुकीच्या पद्धतीने केलेली नोंदणी रद्द केली जाईल, असे आश्वासन देतानाच पीडितांनी थेट पोलिसांकडे येऊन तक्रार करावी, असे के. रामराजन यांनी म्हटले. आरबीआयच्या नियमांचे उल्लंघन करून व्याजाची वसुली करणाऱ्यांवर नवीन आणि जुन्या कायद्यानुसार कडक कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

गोकाक उपविभागातील पोलिसांनी रात्रंदिवस परिश्रम घेऊन चोरीचा मुद्देमाल हस्तगत केल्याबद्दल एसपींनी पथकाचे कौतुक केले. या पत्रकार परिषदेला गोकाकचे डीएसपी रवी नायक, सीपीआय आर. सुरेशबाबू, श्रीशैल बॅकूड, पीएसआय के. वालीकार, कुरण मोहिते, यमनप्पा मांग, आनंद, निखिल कांबळे यांच्यासह इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

Tags: