कागवाड तालुका वकील संघाच्या वर्ष २०२६-२७ च्या निवडणुकीत अध्यक्षपदी उगारचे वकील बी. आर. राव तर उपाध्यक्षपदी शेडबाळचे एस. व्ही. नांद्रे यांची निवड झाली आहे. बुधवारी पार पडलेल्या या निवडणूक प्रक्रियेत वकील संघाच्या नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली.


कागवाड वकील संघाच्या प्रशासकीय मंडळासाठी बुधवारी मतदान प्रक्रिया पार पडली. नूतन अध्यक्ष बी. आर. राव यांनी निवडीनंतर बोलताना सर्व सदस्यांचे आभार मानले. “सर्व सदस्यांनी माझ्यावर विश्वास दाखवत माझी निवड केली आहे. राज्य सरकारने मंजूर केलेल्या न्यायालयाच्या नवीन इमारतीचे काम पूर्ण करण्यासाठी मी विशेष प्रयत्न करेन. तसेच वकिलांच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी सदैव तत्पर राहीन,” असे आश्वासन बी. आर. राव यांनी दिले.
या निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी म्हणून वकील जिनेंद्र कुरंदवाडे यांनी काम पाहिले.
निवडणुकीत केवळ अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी मतदान घेण्यात आले, तर उर्वरित पदांसाठीची निवड बिनविरोध झाली. यामध्ये सचिव म्हणून मनोज वड्डर, संयुक्त सचिवपदी शाणूरहुसेन मकानदार, महिला प्रतिनिधी म्हणून शुभांगी चौगुले यांची निवड करण्यात आली. तसेच मॅनेजिंग कमिटी सदस्य म्हणून दीपा कोरबू, बी. एल. नदाफ आणि एस. एम. कांबळे यांची बिनविरोध निवड झाली.
सदर निवडणूक प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी मंजुनाथ हुणकांबळे, पी. ए. माने, ए. एस. कमते, बी. ए. मगदूम, एम. ए. पाटील, माजी अध्यक्ष ए. एस. कनाळ, तात्यासाहेब धोतरे, बी. पी. देसिंगे यांच्यासह अनेक सदस्यांनी सहकार्य केले. नूतन अध्यक्ष बी. आर. राव हे मागील २० वर्षांपासून तर उपाध्यक्ष एस. व्ही. नांद्रे हे १० वर्षांपासून वकिली क्षेत्रात कार्यरत आहेत. निवडीनंतर समर्थकांनी सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत सत्कार केला.


Recent Comments