उगार येथील श्री मल्लिकार्जुन गुरुदेवाश्रमात वार्षिक उत्सवानिमित्त आयोजित विविध धार्मिक कार्यक्रमांचा सोमवारी थाटात प्रारंभ झाला. या सोहळ्याच्या निमित्ताने आध्यात्मिक प्रवचन आणि सत्संग कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


कार्यक्रमाचे उद्घाटन करताना बिळूर येथील विरक्तमठाचे परमपूज्य श्री गुरुचन्नबसव स्वामीजी यांनी भारतीय संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित केले. हस्तांदोलन करण्याऐवजी हात जोडून नमस्कार करण्याची आपली संस्कृती असून, ती संपूर्ण जगासाठी दीपस्तंभ असल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय संस्कृती मानवी जीवन मूल्यांवर आधारित असून आत्मचिंतन, सहानुभूती आणि सत्यनिष्ठा हाच त्याचा खरा पाया आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सुरुवातीला वेदान्त केसरी श्री मल्लिकार्जुन स्वामीजी आणि ‘चालते बोलते दैवत’ श्री सिद्धेश्वर स्वामीजींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी गुरुदेवाश्रमाचे श्री बसवलिंग स्वामीजी यांची दिव्य उपस्थिती होती.

या सोहळ्यात पंढरपूर येथील पूज्य ब्रह्मचैतन्य सद्गुरु प्रभुराज वासकर महाराज यांनी जागतिक परिस्थितीवर भाष्य केले. आज जगात युद्धाची अनिश्चितता वाढत असताना भारतीय संस्कृतीतील संयम आणि नीतिमत्ता हे औषधासारखे काम करतील, असे ते म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य आणि त्यांनी स्त्रियांना दिलेला सन्मान हीच आपली खरी सांस्कृतिक मूल्ये आहेत, अशी भावना प्रभुराज वासकर महाराज यांनी व्यक्त केली.
विजापूर येथील ज्ञानयोगाश्रमाचे ज्ञानानंद स्वामीजी यांनी शेजारील देशांशी युद्धाने नव्हे तर स्नेहाने वागण्याचा संदेश दिला. भाषा कोणतीही असो, त्यातील संस्कार महत्त्वाचे आहेत आणि श्री सिद्धेश्वर स्वामीजींचे विचार आजही जगाला दिशा देणारे आहेत, असे प्रतिपादन ज्ञानानंद स्वामीजी यांनी केले.
मुलांना केवळ इंग्रजी शिक्षण न देता त्यांच्यात नैतिक मूल्ये रुजवा, असा सल्ला गुरुदेवाश्रमाचे श्री बसवलिंग स्वामीजी यांनी दिला. आई-वडील आणि गुरूंचा आदर केल्याशिवाय जीवनात यश संपादन करता येत नाही, असे श्री बसवलिंग स्वामीजी यांनी म्हटले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुभाष शेवाळे गुरुजी, महादेव कटगेरी, वीरभद्र कटगेरी, मंजुनाथ तारदाळे, गिरीगौडा कागे यांच्यासह अनेक मान्यवरांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशिकांत भैरगोंड यांनी केले.


Recent Comments