Bagalkot

बागलकोट पोटनिवडणुकीच्या आखाड्यात मंत्री जमीर अहमद यांची एन्ट्री

Share

बागलकोट पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीत आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेस उमेदवार उमेश मेटी यांच्या विजयासाठी मंत्री जमीर अहमद आज निवडणूक मैदानात उतरले असून त्यांनी अल्पसंख्याक बहुल भागात जोरदार प्रचार सुरू केला आहे.

बागलकोट मधील नवनगर येथील वांबे कॉलनीमध्ये मंत्री जमीर अहमद यांनी आज झंझावाती प्रचार केला. काँग्रेस उमेदवार उमेश मेटी यांच्या समर्थनार्थ त्यांनी मुस्लिम समाजातील प्रमुख नेत्यांसह भव्य रोड शो काढून आपले शक्तीप्रदर्शन केले. अल्पसंख्याक आणि मागासवर्गीय मतदारांची मोठी संख्या असलेल्या या भागात जमीर अहमद यांच्या आगमनाने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला आहे.

वांबे कॉलनीमधील प्रत्येक घरात जाऊन जमीर अहमद यांनी मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधला. यावेळी स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. सरकारच्या जनहितकारी योजनांमुळे जनता काँग्रेसच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, असा विश्वास जमीर अहमद यांनी व्यक्त केला. या आक्रमक प्रचारामुळे बागलकोटमधील निवडणूक आखाडा आता अधिकच रंगात आला आहे.

Tags: