gokak

मंत्री सतीश जारकीहोळी यांच्याकडून लोळसूर पुलाच्या कामाची पाहणी

Share

सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी गोकाक जवळील लोळसूर येथे घटप्रभा नदीवर उभारण्यात येत असलेल्या नवीन पुलाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. ३०.२१ कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या या पुलामुळे पावसाळ्यातही वाहतूक सुरळीत राहण्यास मदत होणार आहे.

नव्या पुलाच्या निर्मितीमुळे नागरिक आणि वाहनधारकांसाठी दळणवळण सुलभ होणार असून पुरासारख्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करणे सोपे जाईल. ब्रिटीशकालीन अरुंद पूल आणि १९६४ मध्ये बांधलेला पूल यांच्या मध्यभागी हा नवीन पूल साकारला जात आहे. जुन्या दोन्ही पुलांना कोणतीही इजा न पोहोचवता काम पूर्ण करावे, अशा सूचना सतीश जारकीहोळी यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

त्यानंतर मंत्र्यांनी संकेश्वर-यरगट्टी राज्य महामार्गावरील घटप्रभा शहराजवळ कालव्यावर सुरू असलेल्या पुलाच्या कामाचीही पाहणी केली. वाहनधारकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी पर्यायी तात्पुरता पूल तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश सतीश जारकीहोळी यांनी संबंधित विभागाला दिले.

या दौऱ्यात सतीश जारकीहोळी यांनी घटप्रभा येथील मोरारजी शाळेला भेट देऊन शैक्षणिक सोयीसुविधांची पाहणी केली. शाळेतील पायाभूत सुविधा आणि निवासाच्या व्यवस्थेबाबत माहिती घेतल्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांनी दर्जेदार शिक्षण घेऊन समाजासाठी आदर्श बनावे, असा संदेश सतीश जारकीहोळी यांनी यावेळी दिला. याप्रसंगी शिवू पाटील, राजू दरगशेट्टी, आरिफ पीरजादे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Tags: