गोकाकमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे अनुसूचित जातीच्या जमिनी बळकावणाऱ्या भूमाफियांच्या विरोधात आज संतापाचा उद्रेक झाला. शेकडो बाधितांनी मुख्य आरोपी आनंद गोटडकीच्या अटकेसाठी तहसीलदारांवर भव्य मोर्चा काढून प्रशासनाला इशारा दिला.

गोकाक येथील कोन्नूर-शिवापूर भागातील अनुसूचित जातीच्या कुटुंबांना सरकारने १९३८ मध्ये दिलेल्या जमिनी बनावट कागदपत्रांच्या आधारे हडप करण्यात आल्या आहेत. बॉण्ड रायटर आनंद गोटडकी आणि त्याच्या साथीदारांनी मालकांना अंधारात ठेवून या जमिनी स्वतःच्या नावावर नोंदवून घेतल्याचा आरोप करत आज आंदोलकांनी बसवेश्वर चौकात आरोपीचा पुतळा जाळला. निवृत्त पीएसआय केम्पण्णा गुडज यांनी यावेळी प्रशासनावर टीका करताना सांगितले की, गोटडकीवर ८ गुन्हे नोंद असूनही पोलीस त्याला अटक करण्यास टाळाटाळ करत आहेत.

या अन्यायाविरोधात शेकडो बाधितांनी पदयात्रा काढत तहसीलदार कार्यालयावर धडक दिली आणि मागण्यांचे निवेदन सादर केले. दोषींचा परवाना रद्द करून त्यांना तुरुंगात धाडावे, अन्यथा संपूर्ण बेळगाव जिल्ह्यात तीव्र संघर्ष छेडला जाईल असा इशारा धन्यकुमार मेगेरी आणि अन्य आंदोलकांनी दिला आहे.
या आंदोलनात कोन्नूर परिसरातील शेकडो नागरिक सहभागी झाले होते, ज्यामुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे.


Recent Comments