तमदड्डी गावात जैन मुनींच्या पावन सानिध्यात पाच दिवस तीर्थंकरांच्या विविध कल्याणक विधींचे आयोजन करण्यात आले होते. विश्वशांतीच्या संकल्पाने पार पडलेल्या या धार्मिक सोहळ्यात भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतला.

स्वस्तीश्री जिनसेन भट्टारक स्वामीजी आणि आचार्य १०८ शांतिसेन मुनीमहाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा पंचकल्याणक सोहळा पार पडला. या पाच दिवसांत गर्भ, जन्म, दीक्षा, ज्ञान आणि निर्वाण अशा पाचही कल्याणक पूजा विधींचे शास्त्रोक्त आयोजन करण्यात आले होते.
या गावात नव्याने उभारण्यात आलेल्या भगवान पार्श्वनाथ जिनालयाच्या शिखर प्रतिष्ठापनेनिमित्त हा महोत्सव झाला. तसेच पहिल्यांदाच वर्तमानकाळातील २४ तीर्थंकरांचे सामूहिक पंचकल्याणक पूजन करण्यात आले.

या विधींचे पौरोहित्य पंडित बाहुबली उपाध्ये आणि पंडित भरतेश उपाध्ये यांनी केले. तीर्थंकरांचे माता-पिता होण्याचा मान प्रवीण सुरेश पाटील दांपत्याला मिळाला, तर चंद्रकांत अकिवाट आणि वर्धमान मल्लन्नवर दांपत्याने अनुक्रमे सौधर्म इंद्र व कुबेर म्हणून विधी पार पाडले.
या सोहळ्याला खासदार पी.सी. गद्दीगौडर, लक्ष्मण सवदी, बसणगौडा पाटील यत्नाळ, बी.वाय. विजयेंद्र यांच्यासह अनेक राजकीय दिग्गजांनी उपस्थिती लावून आशीर्वाद घेतले. हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी अभय शिरहट्टी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले असून सुमारे ६० हजार भाविक यात सहभागी झाले होते.


Recent Comments