ग्रामीण भागाचा विकास आणि प्रशासकीय सेवा लोकांना सुलभ व पारदर्शक पद्धतीने मिळाव्यात या उद्देशाने हंदिगनूर आणि होस वंटमुरी येथे सुसज्ज ग्रामपंचायत इमारती उभारण्यात आल्या आहेत. या इमारतींमुळे गावांच्या सर्वांगीण विकासाला गती मिळेल, असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केला.


यमकनमर्डी मतदारसंघातील हंदिगनूर आणि होस वंटमुरी गावांत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या नवीन ग्रामपंचायत इमारतींचे लोकार्पण केल्यानंतर ते बोलत होते.


तुमच्या सर्वांच्या सहकार्यातून या इमारती साकारल्या आहेत. गावांमध्ये जास्तीत जास्त विकासकामे व्हावीत, यासाठी क्षेत्र विकास, शिक्षण आणि शालेय मुलांच्या सुविधांना प्राधान्य द्या. ग्रामपंचायत सदस्यांनी जनतेला विश्वासात घेऊन काम केल्यास मतदार तुम्हाला पुन्हा संधी देतील, असे सतीश जारकीहोळी यांनी म्हटले.

ग्रामपंचायतींनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासोबतच पिण्याचे पाणी, वीज, ग्रामीण रस्ते आणि गटारांसारख्या पायाभूत सुविधा जनतेला उपलब्ध करून द्याव्यात. विरोधकांच्या टीकेकडे दुर्लक्ष करून आपण चांगले काम करत राहूया. काम करणाऱ्यांवर टीका करणारे नेहमीच असतात, मात्र त्या टीकेमुळे काम करणाऱ्याला अधिक उत्साह आणि शक्ती मिळते. टीका ही विकासासाठी प्रेरणा ठरते, त्यामुळे जनसेवेत मग्न राहा, असा सल्ला सतीश जारकीहोळी यांनी कार्यकर्त्यांना दिला.

या प्रसंगी मंत्र्यांचे स्वीय सहाय्यक मलगौडा पाटील, चिक्कोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष रामण्णा गुळ्ळी, हंदिगनूर ग्रा.पं. अध्यक्ष उज्ज्वल सुतार, उपाध्यक्ष दयानंद, सुरेश जाधव, नागेश, होस वंटमुरी ग्रा.पं. अध्यक्ष सिद्धप्पा होळीकार, जि.पं. सदस्य सिद्धू सुणगार यांच्यासह ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते.



Recent Comments