मोबाईलच्या अतिरेकामुळे वाचनाचे प्रमाण कमी होत असून वाचकांना दर्जेदार साहित्य देण्यासाठी साहित्यिकांनी स्वतःचे वाचन आणि लेखन समृद्ध केले पाहिजे. साहित्यामुळेच खऱ्या अर्थाने जीवनाचा अर्थ कळतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. उमा कुलकर्णी यांनी केले. बेळगुंदी येथे रवळनाथ पंचक्रोशी साहित्य अकादमीतर्फे आयोजित २० व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून त्या बोलत होत्या.


यावेळी डॉ. कुलकर्णी यांनी अनुवादित साहित्याचे महत्त्व सांगतानाच मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करण्याचे आवाहन पालकांना केले. ज्ञानेश्वरी हे भगवद्गीतेचा अनुवाद असून अनुवादाने भाषेची उंची वाढते, असे त्या म्हणाल्या. साहित्य केवळ ज्ञानपीठापुरते मर्यादित न राहता ते नोबेलपर्यंत पोहोचावे यासाठी प्रयत्न करा, अनुवादाचे महत्त्व सांगताना त्यांनी ज्ञानेश्वरी हा भगवद्गीतेचा उत्तम अनुवाद असल्याचे उदाहरण दिले. मुलांनी पुस्तके वाचावीत यासाठी पालकांनी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी नमूद केले.

तत्पूर्वी, विमान अपघातात निधन झालेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहून संमेलनाची सुरुवात करण्यात आली. सकाळी देव रवळनाथ मंदिरापासून भव्य ग्रंथदिंडी काढण्यात आली. वारकऱ्यांचा टाळ-मृदंगाचा गजर आणि विद्यार्थिनींचा सहभाग हे या दिंडीचे मुख्य आकर्षण होते. दुसऱ्या सत्रात प्रा. संजय ठिगळे, चिंतामणी सहस्त्रबुद्धे आणि पत्रकार शेखर जोशी यांनी संवाद साधला. सीमाभागातील मराठी टिकवण्याच्या धडपडीचे जोशी यांनी कौतुक केले, तर ठिगळे यांनी पुस्तक हे कठीण काळातील बळ असल्याचे सांगितले.
तिसऱ्या सत्रात कविसंमेलन पार पडले. यावेळी कविसंमेलनाचे अध्यक्ष गौतम कांबळे यांनी ‘बाप’ ही कविता सादर करत दर्जेदार साहित्य वाचनातूनच निर्माण होते असे सांगितले. मुबारक उमराणी, भूमी भातकांडे यांच्यासह अनेक कवींनी आपल्या रचना सादर केल्या.
शेवटच्या कथाकथन सत्रात शरद जाधव यांनी ‘गस्त’ या ग्रामीण कथेच्या माध्यमातून उपस्थितांना खळखळून हसविले आणि साहित्यातून होणाऱ्या संवादाचे महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमाचे उद्घाटन माजी जिल्हा पंचायत सदस्य मोहन मोरे यांच्या हस्ते झाले. संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. अरुण जाधव यांनी प्रास्ताविक केले. या सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला.


Recent Comments