Chikkodi

शेतीसाठी पूर्ण दाबाने वीजपुरवठा करा, अन्यथा उग्र आंदोलनाचा छेडू; शेतकरी संघटनांचा इशारा

Share

शेती पिकांच्या संरक्षणासाठी पूर्ण दाबाने आणि पुरेसा वीजपुरवठा करण्यात यावा, अन्यथा सर्व शेतकरी मिळून तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा राज्य शेतकरी संघटना आणि हसिंरु सेनेचे प्रदेशाध्यक्ष गणेश इळिगार यांनी दिला आहे.

बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील सदलगा येथील शिवाजी चौकात विविध मागण्यांसाठी राज्य शेतकरी संघटना आणि हसिंरु सेनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी आंदोलकांना संबोधित करताना इळिगार बोलत होते.

अनधिकृत सिंचन पंपसेट अधिकृत करण्यात यावेत, तसेच हे काम करताना अधिकाऱ्यांनी लाच घेणे बंद करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. हेस्कॉम कार्यालयात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू असून लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांच्या समस्या सोडवाव्यात, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

यावेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दरीखान अज्जवरू यांनी गंभीर आरोप करताना सांगितले की, “हेस्कॉमचे लाईनमन शेतकऱ्यांना नाहक त्रास देत आहेत. वीजपुरवठा खंडित करण्याची धमकी देऊन पैशांची वसुली केली जात आहे. तसेच पंपसेट नियमित करण्यासाठीही पैशांची मागणी केली जात आहे.”

आंदोलनास्थळी सडलगा हेस्कॉमचे एईई बी.व्ही. पुजारी यांनी भेट देऊन शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारले. शेतकऱ्यांच्या मागण्या वरिष्ठांच्या कानावर घालून त्या सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी दिले.

या आंदोलनात महिला प्रदेशाध्यक्षा सरोजिनी अर्गे, पंकज तिप्पण्णावार, तात्यासाहेब बसण्णावार, रमेश पाटील यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते.

Tags: