Chikkodi

चिंचवड, अथणीत गुरुजींनीच मुलांच्या हाती दिले कुदळ-फावडे; शाळेत शिक्षणाऐवजी राबवून घेण्याचा अघोरी प्रकार

Share

चिक्कोडी आणि अथणी परिसरातील सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांकडून मजुरांसारखी कामे करून घेण्याचे गंभीर प्रकार उघडकीस आले आहेत. मुलांना शिक्षण देण्याऐवजी त्यांच्याकडून कष्टाची कामे करून घेऊन शिक्षकांनीच बालहक्कांची उघड पायमल्ली केल्याचा आरोप होत आहे.

बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील केरुंर ग्रामपंचायत हद्दीतील गावड्यानवाडी येथील सरकारी शाळेत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या शाळेत विद्यार्थ्यांच्या हाती पेन आणि पुस्तकांऐवजी कुदळ-फावडे देऊन त्यांच्याकडून माती आणि दगड उचलण्याचे काम करून घेण्यात आले. चिमुरड्यांना अशा प्रकारे राबवून घेतल्याने पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

असाच आणखी एक प्रकार अथणी तालुक्यातील रड्डेरहट्टी येथील ‘पीएम श्री’ प्राथमिक व उच्च प्राथमिक कन्नड सरकारी शाळेत समोर आला आहे. येथेही शिक्षकांनी स्वतःच्या कामासाठी विद्यार्थ्यांचा मजूर म्हणून वापर केल्याचे वृत्त आहे. सरकारी शिक्षकांच्या या अमानवीय वर्तणुकीमुळे ग्रामस्थ आक्रमक झाले असून, संबंधित दोषी शिक्षकांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. शिक्षण मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणी तातडीने चौकशी करून न्याय द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.

Tags: