gokak

कोन्नूरच्या ग्रामदैवत द्यामम्मा देवीच्या यात्रेनिमित्त ‘नारळ पूजन’ संपन्न

Share

गोकाक तालुक्यातील कोन्नूर येथील ग्रामदैवत द्यामम्मा देवीचा यात्रा महोत्सव २० ते २५ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. या यात्रेचा प्राथमिक विधी म्हणून आज मरडीमठच्या श्रींच्या आशीर्वादाने, डीसीसी बँकेचे संचालक अमरनाथ जारकीहोळी आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत पारंपरिक ‘नारळ पूजन’ सोहळा पार पडला.

आज सकाळी बडीगेर घराण्यातील मानकऱ्यांच्या हस्ते तसेच मरडीमठच्या श्रींच्या हस्ते विधी पार पडले. त्यानंतर देवीची मूर्ती आणि नारळाची मिरवणूक काढण्यात आली. श्री हनुमान मंदिरात नारळ पूजन केल्यानंतर भाविकांनी मोठ्या उत्साहात भंडाऱ्याची उधळण केली. यावेळी संपूर्ण परिसर भंडारा आणि देवीच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता.

आजपासून २० फेब्रुवारीला यात्रा सुरू होईपर्यंत कोन्नूर गावात एक विशेष परंपरा पाळली जाते. यादरम्यान येणाऱ्या प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी, असे एकूण पाच आठवडे अन्नाला फोडणी न देता स्वयंपाक केला जातो. यात्रेच्या पूर्वतयारीचा हा एक भाग मानला जातो.

या यात्रेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथे कोणत्याही प्रकारचा प्राणीबळी दिला जात नाही. पूर्णपणे शाकाहारी यात्रा म्हणून कोन्नूरच्या या उत्सवाची पंचक्रोशीत मोठी ख्याती आहे. नऊ वर्षांनंतर भरणारी ही यात्रा सर्व धर्मीयांना एकत्र आणणारी ठरते.

याप्रसंगी ईरय्या गणाचारी, विनोद करनिंग, मारुती पूजेरी, प्रकाश करनिंग, शेखर गुडज यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Tags: