Belagavi

अमरशिल्पी जकणाचारी स्मृतिदिनानिमित्त विश्वकर्मा समाजाचा गौरव

Share

टीका ही तात्पुरती असते, मात्र केलेले कार्य कायमस्वरूपी टिकते. विश्वकर्मा समाज अल्पसंख्याक असला तरी कोणत्याही क्षेत्रात मागे नाही. या समाजाच्या प्रगतीसाठी सर्वांनी जबाबदारीने काम करणे आवश्यक आहे, असे मत कल्लाप्पा बडिगेर यांनी व्यक्त केले.

बेळगाव जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, कन्नड आणि संस्कृती विभाग तसेच महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने अमरशिल्पी जकणाचारी स्मृतिदिन सोहळा आयोजित करण्यात आला होता. शहर कुमार गंधर्व कला मंदिर येथे झालेल्या या कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर कन्नड आणि संस्कृती विभागाच्या सहाय्यक संचालक विद्यावती भजंत्री, पिंटू बडिगेर, ए.बी. संपगावक उपस्थित होते.

कार्यक्रमात बोलताना कल्लाप्पा बडिगेर म्हणाले की, कर्नाटकातील विश्वकर्मा समाजाची कीर्ती आज जगभरात पसरली आहे. अरुण योगीराज यांनी अयोध्येतील राम मंदिरासाठी घडवलेली रामाची मूर्ती हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. समाज आता जागृत झाला असून शैक्षणिक क्षेत्रातही मोठी प्रगती झाली आहे. अनेक तरुण आज उच्च पदांवर कार्यरत आहेत, याचा अभिमान वाटतो, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

याप्रसंगी समाजातील उल्लेखनीय सेवा बजावणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान, अमरशिल्पी जकणाचारी यांची जयंती शासकीय स्तरावर साजरी करून त्या दिवशी सरकारी सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी रमेश देसूरकर आणि मंजुनाथ बडिगेर यांनी सरकारकडे केली. यावेळी सिद्धार्थ सुतार, पौर्णिमा पत्तार, अर्चना मेस्त्री, रेखा सुतार, राघवेंद्र हावण्णवर, आकाश देशनूर, ज्योती सुतार यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: