Belagavi

विधानसभेत ‘गृहलक्ष्मी’ योजनेवरून गदारोळ; मंत्र्यांनी व्यक्त केली दिलगिरी, तर विरोधकांचा सभात्याग

Share

आज विधानसभेत ‘गृहलक्ष्मी’ योजनेच्या थकित हप्त्यांवरून जोरदार गदारोळ झाला. विरोधी सदस्यांनी वेलमध्ये उतरून निदर्शने करत मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या उत्तराची मागणी केली. यावर मंत्र्यांनी सभागृहात हप्ते थकल्याचे मान्य करत तांत्रिक चुकीबद्दल दिलगिरी व्यक्त केली. मात्र, या उत्तराने समाधान न झाल्याने विरोधकांनी सरकारचा निषेध करत सभात्याग केला.

बुधवारी सभागृहाचे कामकाज सुरू होताच, फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या हप्त्यांबाबत चुकीची माहिती दिल्याचा आरोप करत भाजप आणि जेडीएस सदस्यांनी सभापतींसमोर जोरदार घोषणाबाजी केली. या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब करावे लागले.

कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी विचारले की, “दोन महिन्यांचा सुमारे ५,५०० कोटी रुपयांचा गृहलक्ष्मी निधी कुठे गेला?” मंत्र्यांनी सभागृहाची दिशाभूल केल्याचा आरोप करत अशोक यांनी टोला लगावला की, “रात्री उशिरापर्यंत डिनर मीटिंग सुरू असल्यास सकाळी उठायला उशीर होतो, त्यामुळे तयारीअभावी अशी चुकीची उत्तरे दिली जातात.”

मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे स्पष्टीकरण: या वादावर उत्तर देताना महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, “सभागृहात चुकीची माहिती देण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या निधीबाबत वारंवार विचारणा झाल्यावर मी पुन्हा तपासणी केली, तेव्हा तांत्रिक कारणास्तव ३ महिन्यांच्या निधीत तफावत असल्याचे लक्षात आले. प्रत्येक महिन्याला २ हजार रुपये दिले जात आहेत, मात्र फेब-मार्चचा निधी अद्याप बाकी असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. डीबीटीद्वारे हा निधी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केला जाईल. माझ्या माहितीमुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करते.”

मंत्र्यांनी पैसे थकल्याचे मान्य केले असले तरी, आर. अशोक आणि इतर विरोधी सदस्यांनी त्यांच्या उत्तरावर असमाधान व्यक्त केले. मंत्र्यांनी आपण ‘महिला’ असल्याचा उल्लेख करत विरोधकांच्या वर्तनावर आक्षेप घेतल्याने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पुन्हा शाब्दिक चकमक उडाली. अखेर, मंत्र्यांच्या उत्तराचा निषेध करत आर. अशोक यांच्या नेतृत्वाखाली विरोधी सदस्यांनी सभागृहातून सभात्याग केला.

Tags: