Belagavi

बेळगावमध्ये उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या हस्ते ‘स्वच्छता दौड’ला प्रारंभ

Share

स्वच्छतेच्या बाबतीत राज्यातील महानगरपालिकांमध्ये म्हैसूर शहर प्रथम स्थानी असून बेळगाव सध्या २५ व्या क्रमांकावर आहे. मात्र, नागरिक आणि विद्यार्थ्यांनी मनावर घेतल्यास बेळगावला पहिल्या क्रमांकावर आणणे शक्य आहे, असे आवाहन नगरविकास मंत्री भैरती सुरेश यांनी केले.

बेळगाव येथे आयोजित ‘स्वच्छता दौड’ कार्यक्रमात ते बोलत होते. बेळगावमधील अशोक चौक येथे आयोजित स्वच्छता मोहिमेचा भाग असलेल्या ‘स्वच्छता दौड’ला उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी हिरवे निशाण दाखवून सुरुवात केली. नगरविकास विभाग आणि नगरपालिका प्रशासन विभागाच्या संयुक्त विद्यमाने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार म्हणाले की, बंगळुरूपेक्षा बेळगावचे वातावरण अधिक सुंदर असून, हे शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी प्रत्येकाने मनापासून प्रयत्न केले पाहिजेत.

अशोक चौक ते किल्ला तलावापर्यंत आयोजित या ५ किलोमीटरच्या धावणुकीत शेकडो नागरिक आणि विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी केवळ दौड सुरू केली नाही, तर स्वतः एक किलोमीटरपर्यंत पदयात्रा करत नागरिकांमध्ये स्वच्छतेचा संदेश दिला.

स्वच्छता हीच सेवा असून गांधीजींचा हा संदेश केवळ घोषणा न राहता कृतीत उतरायला हवा, असे मत मंत्री बायराथी सुरेश यांनी व्यक्त केले. नागरिक आपल्या घराची जशी काळजी घेतात, त्याचप्रमाणे शहरातील रस्त्यांनाही आपली मालमत्ता समजून स्वच्छ ठेवावे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

या मोहिमेत राज्य सरकारचे अनेक प्रमुख मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Tags: