Belagavi

नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेस नेत्यांना न्यायालयाचा दिलासा

Share

नॅशनल हेराल्ड प्रकरणात राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यासह इतर नेत्यांना दिल्ली न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. या पार्श्वभूमीवर, भाजपच्या सूडाच्या राजकारणाविरोधात बेळगाव येथील सुवर्णसौधमधील महात्मा गांधी पुतळ्यासमोर काँग्रेस नेत्यांनी जोरदार निदर्शने केली.

केंद्रातील भाजप सरकार केवळ जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी विरोधी पक्षांच्या नेत्यांवर खोटे गुन्हे दाखल करत असल्याचा आरोप मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केला. दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या आणि काळा पैसा परत आणण्याचे आश्वासन मोदी सरकारने पूर्ण केले नाही. महागाई लपवण्यासाठी आता द्वेषाचे राजकारण केले जात असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करत भाजपवर घणाघाती टीका केली. नॅशनल हेराल्ड ही देशाची मालमत्ता असून भाजपने केवळ त्रास देण्यासाठी ईडीचा वापर केल्याचे त्यांनी म्हटले. भाजप हा फसववा पक्ष असून गांधीजींचे नाव पुसून गोडसेचे विचार लादण्याचा त्यांचा प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाही, अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.

महसूल मंत्री कृष्णा बायरेगौडा यांनीही भाजपवर निशाणा साधला. विरोधी पक्षांच्या नेत्यांवर धाडी टाकून त्यांना आपल्या पक्षात ओढण्याचे काम भाजप करत असल्याचे त्यांनी सांगितले. देशात लोकशाही केवळ नावापुरती उरवून एकहाती सत्ता गाजवण्याचा भाजपचा डाव असून काँग्रेस याविरोधात लढा देईल, असे त्यांनी नमूद केले.

या आंदोलनात मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, के. जे. जॉर्ज, एच. के. पाटील, ईश्वर खंड्रे, के. एच. मुनियप्पा, भैरती सुरेश यांच्यासह अनेक आमदार आणि विधान परिषद सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Tags: