“गृहलक्ष्मी योजना यशस्वी झाल्याने भाजप नेते आता विनाकारण या योजनेची बदनामी करून त्यावर चिखलफेक करण्याचे काम करत आहेत,” अशा शब्दांत महिला आणि बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला.

बेळगावच्या सुवर्णसौधमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी गृहलक्ष्मी योजनेच्या निधीवरून सुरू असलेल्या वादावर आपली भूमिका स्पष्ट केली. लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या की, गृहलक्ष्मी योजना सुरू झाल्यापासून भाजप नेते सातत्याने त्यावर टीका करत आले आहेत. “सभागृहात मी कोणतीही चुकीची माहिती दिलेली नाही. आतापर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यात २३ हप्त्यांचे पैसे जमा झाले आहेत, असे मी स्पष्ट केले आहे. सुरुवातीला रस्त्यावर उतरून या योजनेला विरोध करणारे भाजप नेते आता अचानक या योजनेबद्दल काळजी दाखवू लागले आहेत, हे आश्चर्यकारक आहे,” असा टोला त्यांनी लगावला.

काही लाभार्थ्यांचे दोन महिन्यांचे पैसे जमा झाले नसल्याच्या मुद्द्यावर बोलताना मंत्र्यांनी सांगितले की, “फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे काही तांत्रिक कारणांमुळे जमा झालेले नाहीत, असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला होता. यावर मी अर्थखाते सांभाळणारे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याशी सविस्तर चर्चा केली आहे. मुख्यमंत्र्यांनी याबद्दल सकारात्मक प्रतिसाद दिला असून, ज्या लाभार्थ्यांचे पैसे रखडले आहेत, ते तातडीने जमा करण्याची ग्वाही दिली आहे.”
गृहलक्ष्मी योजनेबाबत कोणताही गोंधळ नाही आणि लाभार्थ्यांनी काळजी करू नये. कोट्यवधी महिलांच्या जगण्याला या योजनेमुळे आधार मिळाला असून भाजप केवळ राजकीय हेतूने योजनेचे यश मलीन करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.


Recent Comments