राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा नेहमीच महात्मा गांधींच्या तत्त्वांच्या विरोधात राहिली असून भाजपला नथुराम गोडसेबद्दल अधिक प्रेम आहे, असा घणाघाती आरोप आरोग्य मंत्री दिनेश गुंडूराव यांनी केला.

भाजप सरकार देशावर आरएसएसची विचारधारा लादण्याचे षडयंत्र रचत असल्याची टीका त्यांनी केली. बेळगाव येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. केंद्र सरकार केवळ महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे (नरेगा) नाव बदलत नसून त्यांनी ही संपूर्ण योजनाच दिवाळखोरीत काढली असल्याची टीका दिनेश गुंडूराव यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः भाषणांमधून या योजनेला निकृष्ट दर्जाचे संबोधले होते, असे त्यांनी म्हटले.

ग्रामीण भागातील जनतेला या योजनेतून हक्काची मजुरी मिळत असल्याचे स्पष्ट झाल्यावर आता केवळ नाव बदलण्याचा घाट घातला जात असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. केंद्राचे हे पाऊल गलिच्छ राजकारणाचा भाग असल्याचे त्यांनी नमूद केले.
सरकारी डॉक्टरांना खासगी रुग्णालयात सेवा देण्याबाबत नवीन नियम लागू करण्यावर सरकार विचार करत असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारी रुग्णालयातील विहित वेळेत उपस्थित राहणे डॉक्टरांना बंधनकारक असेल आणि त्याबाबत लवकरच कायदा आणला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.


Recent Comments