आरक्षणातील भेदभाव दूर करावा आणि समाजाच्या विविध प्रलंबित मागण्या मान्य कराव्यात, या आग्रहासाठी आज कर्नाटक राज्य भोवी-वड्डर संघटनांच्या महासंघाच्या वतीने ‘बेळगाव चलो’ आंदोलन करण्यात आले.

सुवर्णसौधसमोर शेकडो समाजबांधवांनी एकत्र येत राज्य सरकारच्या धोरणांचा जोरदार निषेध केला आणि आपल्या मागण्यांचे निवेदन प्रशासनाला सादर केले.

महासंघाचे प्रदेशाध्यक्ष नंजप्पा भोवी यावेळी बोलताना म्हणाले की, आरक्षणाच्या बाबतीत भोवी समाजावर मोठा अन्याय झाला आहे. “एकूण ६३ जातींचा समावेश करून ५ टक्के आरक्षण देण्यात आले आहे, जे आम्हाला मान्य नाही. आम्हाला स्वतंत्र ३ टक्के आरक्षण देण्यात यावे. याशिवाय घरकुल योजना, जमिनीचे वाटप आणि खडक फोडण्याच्या (दगडखाण) व्यवसायामध्येही समाजाला योग्य आरक्षण आणि सोयीसुविधा मिळाल्या पाहिजेत,” अशी मागणी त्यांनी केली.
जातिगणनेच्या प्रक्रियेवर संशय व्यक्त करताना गौतम वेंकी म्हणाले की, सर्वेक्षण करताना आमच्या समाजाचा विचारच केला गेला नाही. प्रगणक आमच्या घरांपर्यंत पोहोचलेच नाहीत, त्यामुळे आमची लोकसंख्या प्रत्यक्षात जास्त असताना ती केवळ ११ लाख २९ हजार इतकीच कमी दाखवण्यात आली आहे. हा आमच्या समाजाविरुद्धचा डाव असून, सरकारने तातडीने फेरसर्वेक्षण करून समाजाला न्याय द्यावा.
या आंदोलनात वेणूगोपाल, विठ्ठल वड्डर, सी. एस. ममदापुरे, संगमेश मुरगोड यांच्यासह राज्यातील विविध भागांतून आलेले समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


Recent Comments