राज्य सरकारने लागू केलेल्या अनुसूचित जातीतील अंतर्गत आरक्षणाच्या निर्णयाविरोधात आज बेळगावात बंजारा, लमाणी आणि भोवी समाजाच्या वतीने विराट निषेध मोर्चा काढण्यात आला.


बेळगाव शहराच्या मालिनी सिटी परिसरात हजारो समाजबांधव एकत्र आले होते. सरकारने अंतर्गत आरक्षणाचा आदेश तातडीने मागे घेऊन त्याचे पुनर्रिक्षण करावे, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी चित्रदुर्गच्या बंजारा पीठाचे सरदार स्वामीजी यांनी यावेळी सभेला संबोधित करताना सरकारवर कडक शब्दांत ताशेरे ओढले. ते म्हणाले, “बंजारा समाज आजही स्वतःची जमीन आणि हक्काच्या रोजगारापासून वंचित आहे. सिद्धरामय्या सरकार कोणाच्या तरी दबावाखाली येऊन आमच्यावर अन्याय करत आहे. ज्यांनी या समाजावर अन्याय केला, ते टिकले नाहीत, हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावे. केवळ ‘एबीसी’ गट करून दिलेले आरक्षण आम्हाला मान्य नाही. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही निवडणुकीसाठी आमच्या तांड्यावर याल, तेव्हा समाज आपली ताकद काय आहे हे दाखवून देईल.”
यावेळी आंदोलकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन प्रशासनाला सादर केले. यामध्ये सरकारने अंतर्गत आरक्षणाच्या आदेशाचे तातडीने पुनर्रिक्षण करावे आणि अशास्त्रीय रोस्टर पद्धत बदलून ‘सिंगल विंडो’ पद्धत लागू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच खाजगी क्षेत्रातही आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी आणि आरक्षण वाढीचा निर्णय संविधानाच्या ९ व्या परिशिष्टात समाविष्ट करावा, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या आंदोलनामुळे बंजारा समाजाने आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.


Recent Comments