बेळगावच्या सुवर्णसौधमध्ये आमदार विजयानंद काशप्पनावर यांनी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या विधानांवर तीव्र प्रतिक्रिया दिली. द्वेषपूर्ण भाषणाबाबत यत्नाळ यांचे विधान, पंचमसाली आरक्षणाचा गोंधळ आणि लाठीचार्ज प्रकरणावर त्यांनी भाष्य केले.

द्वेषपूर्ण भाषण विधेयक केवळ आपल्यासाठीच आणले जात आहे, या आमदार बसवनगौडा पाटील यत्नाळ यांच्या विधानावर काशप्पनावर यांनी उत्तर दिले. कोणालाही लक्ष्य करण्याची गरज नाही. आमदारांनी सभागृहात कसे बोलावे हे शिकले पाहिजे. ‘उचलली जीभ लावली टाळ्याला’ याप्रकारे कुणीही वक्तव्य करू नये, अशा वर्तनावर नियंत्रण ठेवण्यासाठी देशात संविधान आहे, असे त्यांनी सांगितले. अभिव्यक्ती स्वातंत्र्याला धोका असल्याच्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, “भाजपला देशाच्या विकासावर बोलण्याचे स्वातंत्र्य नको आहे, त्यांना देश तोडण्यासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्य हवे आहे,” अशी टीका त्यांनी केली.

यावेळी पंचमसाली २-ए आरक्षणाबद्दल आमदार काशप्पनावर बोलले. सद्यस्थितीत २-ए आरक्षण मागत नसल्याचे पंचमसाली नेत्यांनी सांगितले असले तरी, आम्हाला मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे. पूर्ण मागासवर्गीय आयोगाचा अहवाल घेऊन आम्ही २-ए आरक्षण मिळवून देऊ. मागील बोम्मई सरकारने मध्यंतरीचा अहवाल घेऊन ‘गोंधळ’ केला होता, आता ते त्याचे समर्थन करत आहेत. २-डी किंवा २-सी आरक्षण दिले असले तरी, आमचे सरकार २-ए आरक्षण मिळवून देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
त्यानंतर लाठीचार्ज प्रकरणावर प्रतिक्रिया देताना त्यांनी म्हटले, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुढाऱ्यांकडून दगडफेक भाजप नेत्यांनीच करवली. आमच्या समाजातील लोकांना मारहाण त्यांनीच करवली.” लिंगायतविरोधी सरकार आहे, हे भासवण्यासाठीच त्यांनी हे कृत्य केले आहे. लिंगायत समाजाचे सांस्कृतिक नेते बसवण्णा यांच्या नावाने कार्यक्रम काँग्रेस सरकारनेच केले, असा प्रतिप्रश्न त्यांनी केला.


Recent Comments