Belagavi

लोकांचा कौल डावलून भाजपने मिळवली होती ‘मागील दाराने’ सत्ता : मुख्यमंत्री

Share

२०२३ प्रमाणेच २०२८ मध्येही जनतेच्या आशीर्वादाने काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेत येईल आणि भाजपला कायम विरोधी पक्षातच राहावे लागेल, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या आज बेळगाव येथील सुवर्ण सौधमध्ये सुरू असलेल्या विधानसभा अधिवेशनात बोलत होते. यावेळी आमदार रंगनाथ यांनी मधुगिरीच्या विकासकामांमध्ये होत असलेला भेदभाव दूर करण्याची मागणी केली. यावर मुख्यमंत्र्यांनी पुढील वर्षापासून हा भेदभाव दूर करण्याचे आश्वासन दिले. यावर विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी, “तुम्ही पाच वर्षे सत्तेत राहणार का?” असा प्रश्न विचारला.

यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी, “जखमेवर मीठ टाकू नये” अशी एक म्हण असल्याचे सांगत “विरोधक जखमेवर मीठ मसाला लावण्यासाठीच असतात.” असा टोलाही लगावला. विरोधी पक्ष कितीही प्रक्षोभ निर्माण करण्याचा प्रयत्न करो, आमच्या आमदारांना कोणताही फरक पडणार नाही. लोकांनी मला पाच वर्षे मुख्यमंत्री म्हणून काम करण्यासाठी आशीर्वाद देऊन पाठवले आहे. आमचे १४० आमदार आमच्यासोबत आहेत. विरोधकांनी यामध्ये मिठाचा खडा टाकण्याची किंवा फूट पाडण्याची गरज नाही. २०२३ मध्ये जनतेने जसा आशीर्वाद दिला, तसाच २०२८ मध्येही देईल आणि काँग्रेसचेच सरकार सत्तेत येईल. सरकारला लोकांच्या भावनांची जाण आहे. भाजपने २००८ आणि २०१८ मध्ये ‘ऑपरेशन कमळ’ करून ‘मागील दाराने’ सत्ता मिळवली होती. राज्यातील जनतेचा भाजपला आशीर्वाद नाही, हे स्पष्ट आहे.

काँग्रेस पक्षात ‘हाय कमांड’चा शब्द अंतिम असतो. पण भाजपमध्ये अध्यक्षपदाच्या निवडीवर अजूनही एकमत झालेले नाही. भाजपच्या लोकांना आमचा हेवा वाटत आहे. आम्ही पाच वर्षांचे स्थिर सरकार देऊ आणि पुढील निवडणूक जिंकून २०२८ मध्येही काँग्रेसचेच सरकार सत्तेत येईल. “हे माझे सरकार नाही, तर आमचे सरकार आहे.” तसेच, “आत्ताही मीच मुख्यमंत्री आहे आणि ‘हाय कमांड’ जोपर्यंत सांगत नाही, तोपर्यंत मीच मुख्यमंत्री राहीन,” असे त्यांनी स्पष्ट केले.

Tags: