बेळगाव जिल्ह्याचे बेळगाव, गोकाक आणि चिकोडी असे तीन जिल्हे व्हावेत, जिल्हा विभाजनाचा अंतिम निर्णय घेण्यापूर्वी मुख्यमंत्री सिद्धरामय्या लवकरच आमदारांची बैठक घेणार आहेत, अशी माहिती मंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली.

“बेळगाव जिल्ह्याच्या विभाजनाला मोठी मागणी आहे. त्याचे तीन जिल्ह्यांमध्ये विभाजन व्हायला हवे. बेळगाव, गोकाक आणि चिकोडी असे तीन जिल्हे व्हावेत, अशी मागणी पूर्वीपासूनच आहे,” असे मंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले. अलीकडे बैलहोंगल आणि अथणी हे देखील जिल्हे व्हावेत, अशी मागणी पुढे आली आहे. “परंतु, बेळगाव जिल्ह्याचे केवळ तीनच जिल्ह्यातच त्रिभाजन व्हावे असे आमचे मत आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हा विभाजनासंदर्भात मुख्यमंत्री सिद्धरामय्या लवकरच आमदारांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत आमदारांची मते जाणून घेतल्यानंतरच जिल्ह्यांच्या विभाजनाबद्दल निर्णय घेतला जाईल, अशी माहिती मंत्र्यांनी दिली.
जिल्हा विभाजनामुळे कोणताही मराठी-कन्नड भाषिक संघर्ष होणार नाही, तसेच या विभाजनामुळे कोणतीही अडचण येणार नाही, असे स्पष्टीकरण मंत्र्यांनी दिले. सध्या कोणतेही अहिंद संमेलन आयोजित करण्याची योजना नाही. भविष्यात परिस्थितीनुसार निर्णय घेतला जाईल, असे सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.


Recent Comments