उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी बेळगावमध्ये भाजपवर जोरदार टीका करत हमी योजनांच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या भाजप नेत्यांना म्हादई प्रकल्पासाठी केंद्र सरकारने दिलेल्या निधीच्या आश्वासनाची आठवण करून दिली.

हमी योजनांच्या अंमलबजावणीबाबत आपल्या सरकारची बांधिलकी आहे. मात्र, म्हादई प्रकल्पासाठी भाजपचे नेते केंद्र सरकारकडे ५३०० कोटी रुपयांच्या निधीबाबत आवाज का उचलत नाहीत, असा पलटवार डी.के. शिवकुमार यांनी केला आहे.

बेळगावमध्ये बोलताना उपमुख्यमंत्र्यांनी राज्यात द्वेषपूर्ण भाषणे नियंत्रित करण्यासाठी नवीन विधेयक आणण्याच्या निर्णयाचे समर्थन केले. “आपला एक सुसंस्कृत समाज आहे. कोणीही कोणावर द्वेष करू नये. द्वेष करून कायदा आणि सुव्यवस्था बिघडवू नये. याच पार्श्वभूमीवर आम्ही हा कायदा आणला आहे. हे राज्यासाठी आणि समाजासाठी चांगले आहे,” असे डी.के. शिवकुमार यांनी स्पष्ट केले. द्वेषपूर्ण भाषणे समाजाची शांतता भंग करणार नाहीत, याची खात्री करणे हे सरकारचे प्राथमिक कर्तव्य आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी, हमी योजनांच्या अंमलबजावणीवरून भाजप करत असलेल्या टीकेला उपमुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिले. हमी योजनांबद्दल आपल्या सरकारची बांधिलकी कायम आहे, असे त्यांनी पुन्हा ठामपणे सांगितले. “जीएसटी कपात केल्यामुळे राज्याचे १ ते १५ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे काही गोष्टींमध्ये विलंब होऊ शकतो. आम्ही (योजनांवर) शेकडो कोटी रुपये दिले आहेत, एक-दोन महिने विलंब झाल्यास कोणतीही अडचण येणार नाही,” असे ते म्हणाले. याशिवाय, भाजपच्या नेत्यांनी आधी त्यांच्या पक्षाने इतर राज्यांमध्ये दिलेली आश्वासने पूर्ण करून दाखवावीत, असे आव्हान त्यांनी दिले.
पुढे बोलताना त्यांनी म्हादई प्रकल्पासाठी निधी देण्याचे आश्वासन केंद्र सरकारने दिले होते, याकडे लक्ष वेधले. “तरीही, म्हादईसाठी भाजपचे नेते गदारोळ का करत नाहीत? उत्तर कर्नाटकातील चर्चेसाठी बोलावले असतानाही भाजप त्याबद्दल आवाज का उचलत नाही? ५३०० कोटी रुपयांच्या निधीबद्दल ते का बोलत नाहीत? भाजपच्या नेत्यांनी आधी या सगळ्या समस्या सोडवाव्यात,” अशा शब्दांत उपमुख्यमंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.


Recent Comments