बागलकोट जिल्ह्यातील मुधोळ येथे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या गोंधळावर शेतकरी नेते चूनप्पा पुजारी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शेतकऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत कायदा हातात घेऊ नये, तसेच शांततेत आंदोलन करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. काल मुधोळ तालुक्यात झालेल्या गोंधळामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. बागलकोटमधील गुरलापूर येथे लाखो शेतकरी एकत्र आले, तरी तिथे कोणताही गोंधळ झाला नाही; मात्र मुधोळमध्ये घडलेली घटना योग्य नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. या गोंधळामागे कोण होते, हे स्पष्ट नसले तरी, याचे बळी मात्र शेतकरी ठरले आहेत, अशा शब्दांत त्यांनी खेद व्यक्त केला.
“आम्ही पिकवलेल्या उसाला आग लागल्यास आम्हालाच दुःख होते. कर्जावर घेतलेल्या ट्रॅक्टरला आग लावणे हे कसे योग्य आहे?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. काही साखर कारखाने अजूनही उसाला ३३०० रुपये प्रति टन दर देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप पुजारी यांनी केला. ऊस उत्पादकांच्या समस्या न सुटण्यास साखर विभागाचे अधिकारीच जबाबदार आहेत, अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. जोपर्यंत साखर कारखाने संपूर्ण थकीत रक्कम देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा स्पष्ट इशारा चूनप्पा पुजारी यांनी दिला.


Recent Comments