बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-आरजेडी युतीची ‘इंडिया’ आघाडी सत्तेवर येईल, असा ठाम विश्वास महिला आणि बाल विकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व्यक्त केला.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे (एआयसीसी) अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना हेब्बाळकर यांनी बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलवर प्रतिक्रिया दिली. हरियाणामध्ये एक्झिट पोलने काँग्रेस सत्तेत येईल असे म्हटले होते, पण प्रत्यक्षात भाजप सत्तेवर आले होते. त्यामुळे बिहारमध्ये एनडीएला सत्ता मिळेल, असे एक्झिट पोल सांगत असले तरी, येथे ‘इंडिया’ आघाडीच सत्ता स्थापन करेल, असा दावा त्यांनी केला. याच दरम्यान, ‘जर काँग्रेसचे पंतप्रधान असते आणि त्यांच्या विदेश दौऱ्यात स्फोट झाला असता, तर भाजपवाल्यांची प्रतिक्रिया काय असती, याची कल्पना तुम्हीच करा,’ असा उलट सवालही त्यांनी भाजपला उद्देशून केला.
दुसऱ्या एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी अंगणवाडी सुवर्णमहोत्सव कार्यक्रमाची माहिती दिली. १९ नोव्हेंबर रोजी निश्चित करण्यात आलेला हा कार्यक्रम आता २८ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्याची योजना आहे. या कार्यक्रमात एआयसीसीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, तसेच पक्षाचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी किंवा प्रियांका गांधी सहभागी होण्याची शक्यता आहे, अशी माहिती मंत्री हेब्बाळकर यांनी दिली.


Recent Comments