Banglore

पोलीस दलामुळेच राज्यात शांतता-सुव्यवस्था; विकास साधणे शक्य: मुख्यमंत्री सिद्धरामय्या

Share

पोलीस दलाच्या महत्त्वपूर्ण कार्यामुळे राज्यातील संविधानविरोधी ‘अनैतिक पोलिसगिरी’ला लगाम बसला असून, शांतता व सुव्यवस्था राखण्यात पोलिसांचे मोठे योगदान आहे. हुतात्मा पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बलिदानाचे स्मरण करत मुख्यमंत्र्यांनी पोलीस विभागाच्या कार्याची प्रशंसा केली.

राज्याच्या प्रगतीसाठी महत्त्वाच्या असलेल्या शांतता आणि सुव्यवस्थेचे रक्षण करण्यात पोलीस दल यशस्वी ठरले आहे, ज्याचे श्रेय पोलीस विभागालाच जाते, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पोलीस स्मरण दिनानिमित्त हुतात्मा पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांप्रति शोक व्यक्त करताना म्हटले. अनैतिक ‘पोलिसगिरी’सोबतच अमली पदार्थांच्या विळख्यालाही ब्रेक लागला असून, या कामगिरीचे कौतुक करताना त्यांनी हे काम अधिक प्रभावीपणे करण्याची गरज व्यक्त केली. तसेच, राज्यातील अनुसूचित जाती आणि जमातींवरील अत्याचार रोखण्यासाठी DCRE पोलीस ठाणी कार्यान्वित करण्यात आली असून, संविधानात्मक हक्क आणि मूल्यांचे संरक्षण करण्यासाठी ही ठाणी प्रभावीपणे काम करतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

गेल्या एका वर्षात देशात कर्तव्य बजावताना एकूण १९१ जवानांनी प्राण गमावले, ज्यात राज्यातील ८ जवानांचा समावेश आहे. त्यांचे त्याग आणि बलिदान अमूल्य आहे, ज्याचे स्मरण करणे आणि त्यांना वंदन करणे हे संपूर्ण देशाचे कर्तव्य आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. पोलीस दल देशात शांतता व सुव्यवस्था राखण्यात अग्रभागी असून, संविधानिक हक्क जपण्यासोबतच जातीयवादी आणि दृष्ट शक्तींना आवर घालण्यात पोलिसांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. पोलीस दलासाठी सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत; ज्यात ११६ जणांना अनुकंपा तत्त्वावर नोकरीचे आदेश, निवृत्त पोलिसांच्या आरोग्य योजनेतील वैद्यकीय खर्चाची वार्षिक मर्यादा १ लाख रुपयांवरून १.५० लाख रुपयांपर्यंत वाढवणे, तसेच सर्व पोलीस कर्मचाऱ्यांच्या आरोग्य तपासणीचा खर्च १,००० रुपयांवरून १,५०० रुपयांपर्यंत वाढवण्याचा समावेश आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

Tags: