बागलकोट येथे प्रसूतीनंतर अवघ्या सहा तासांत एका बाळंतिणीचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बागलकोटच्या कुमारेश्वर वैद्यकीय विज्ञान संस्थेमध्ये (किम्स) सिझेरियन प्रसूतीनंतर ही घटना घडल्यामुळे संतप्त कुटुंबाने डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच मृत्यू झाल्याचा आरोप करत रुग्णालयासमोर तीव्र आंदोलन सुरू केले आहे.

बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग तालुक्यातील अरेबेंची तांडा येथील रहिवासी असलेली २३ वर्षीय पूर्णिमा राठोड ही मृत बाळंतीण. तिला काल (रविवार) सायंकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि आज (सोमवार) दुपारी १२.३० च्या सुमारास सिझेरियनद्वारे तिने एका सुदृढ मुलाला जन्म दिला होता. मात्र, सायंकाळी ७ ते ७.३० च्या दरम्यान पूर्णिमा राठोडला हृदयविकाराचा झटका आला आणि तिचा मृत्यू झाला. बाळंतपणानंतर तिला तीव्र त्रास होत असतानाही मुख्य डॉक्टरांनी येऊन तिची तपासणी केली नाही, केवळ परिचारिकांनाच पाठवले, असा कुटुंबाचा गंभीर आरोप आहे.
त्रास वाढल्यावर परिचारिकेने दिलेल्या इंजेक्शनमुळेच पूर्णिमा तडफडत मरण पावली, असे कुटुंबीयांनी म्हटले आहे.
रुग्णालयाच्या परिसरात मृत महिलेच्या नातेवाईकांचा आक्रोश सुरू असून, त्यांनी डॉक्टरांना शाप देत संताप व्यक्त केला आहे. दुसरीकडे, कुमारेश्वर रुग्णालयाच्या डॉक्टरांनी उपचारात कोणतीही त्रुटी नसल्याचे स्पष्ट केले आहे. ‘सिझेरियन यशस्वी झाले होते. परंतु, सायंकाळी ‘एम.एल.’ नंतर त्यांचा रक्तदाब कमी झाला आणि त्यानंतर हृदयविकाराचा झटका आला. बाळंतिणीला वाचवण्यासाठी सर्व प्रयत्न करण्यात आले, पण ते यशस्वी झाले नाहीत,’ असे डॉक्टरांनी म्हटले आहे.


Recent Comments