Bagalkot

धर्माचे रक्षक कसे? … ‘आरएसएस’वर मंत्री तिम्मापूर यांचे प्रश्नचिन्ह..

Share

राज्यात तसेच देशात दलित आणि महिलांवरील वाढत्या अत्याचारावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नेहमीच मौन बाळगले आहे, अशा शब्दांत कर्नाटकचे मंत्री आर.बी. तिम्मापूर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

अस्पृश्यता आणि दलितांवरील शोषणासारख्या ज्वलंत सामाजिक प्रश्नांवर संघाकडून कधीही चर्चा होत नाही. तसेच, महिलांवरील अत्याचार थांबवण्यासाठी कोणतेही सामाजिक उपक्रम त्यांच्याकडे नाहीत. अशा परिस्थितीत, त्यांना धर्माचे रक्षक कसे म्हणता येईल, असा परखड सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

बागलकोट येथील रबकवी-बनहट्टी तालुक्यातील बंडिगणी गावात ते बोलत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बोलताना ते म्हणाले की, या संघटनेने अस्पृश्यता आणि दलितांवरील शोषणाबद्दल कधीही चर्चा केली नाही. त्यांच्याकडे कोणतेही सामाजिक उपक्रम नाहीत किंवा महिलांवरील अत्याचार थांबवण्यासाठी कोणतेही कार्यक्रम नाहीत. अशा परिस्थितीत, त्यांना धर्माचे रक्षक कसे म्हणता येईल? ते प्रत्येक ठिकाणी आरएसएसचा ध्वज घेऊन फिरले, तर त्यांचे कोण ऐकणार? लोकांनाच त्यांना योग्य धडा शिकवावा लागेल, असे तिम्मापूर यांनी ठामपणे सांगितले.

यावेळी, बळाचा वापर करून कोणत्याही संघटनेला ‘बॅन’ करणे शक्य नाही, असेही तिम्मापूर यांनी स्पष्ट केले. हिंदू धर्मातून बाहेर पडून लिंगायत धर्माकडे लोकांचे आकर्षण वाढत आहे. लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माची मागणी आहे आणि ‘बसव धर्म’ व्हावा, अशी त्यांची तीव्र इच्छा आहे. जर भविष्यात ‘बसव धर्म’ अस्तित्वात आला, तर आपण आपल्या धार्मिक स्तंभात ‘बसव धर्म’ अशी नोंद करू, अशी घोषणा त्यांनी केली. “समाजात अस्पृश्यता असूनही मी स्वतःला हिंदू समजून वावरतो. मग मी श्रेष्ठ की संघ परिवाराचे लोक श्रेष्ठ?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. अशा शब्दांत मंत्री आर.बी. तिम्मापूर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यपद्धतीवर आपली नाराजी व्यक्त केली.

Tags: