Bagalkot

दारूच्या नशेत झालेल्या भांडणात मित्रानेच केला मित्राचा खून!

Share

बागलकोट जिल्ह्यातील बिळगी तालुक्यातल्या गलगली शहरात दारूच्या नशेत झालेल्या भांडणातून एका मित्राने दुसऱ्या मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

रविवारी रात्री मित्रांसोबत पार्टी केल्यानंतर बसय्या मठपती (३४) या मित्राचा मृतदेह आज सकाळी त्याच्याच घरात आढळून आला. या हत्येप्रकरणी त्याचा मित्र बसय्या लिंगनूर (२४) याच्यावर संशय असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री बसय्या मठपती आणि बसय्या लिंगनूर हे तिसऱ्या मित्रासोबत एका निर्जन ठिकाणी पार्टी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी बसय्या मठपती आणि बसय्या लिंगनूर यांच्यामध्ये पूर्ववैमनस्यातून आणि पैशांवरून जोरदार वाद झाला. त्यांनी दोघांना शांत केल्यानंतर तिसरा मित्र घरी निघून गेला, पण दारूच्या नशेत असलेले दोघे जण बसय्या मठपतीच्या रिकाम्या घरात गेले. घरात गेल्यावर पुन्हा दारूच्या नशेत बसय्या लिंगनूरने बसय्या मठपतीकडे आपण दिलेले ४ हजार रुपये परत मागितले, पण त्याने पैसे परत देण्यास नकार दिला. याच कारणामुळे दोघांमध्ये पुन्हा भांडण झाले, अशी माहिती बागलकोटचे पोलीस अधीक्षक सिद्धार्थ गोयल यांनी दिली.

पोलिसांच्या प्राथमिक चौकशीनुसार, बसय्या लिंगनूरने बसय्या मठपतीचा गळा बेल्टने आवळून खून केला असावा असा संशय आहे. आज सकाळी बसय्या मठपतीचा मृतदेह आढळला, तर बसय्या लिंगनूर दुसऱ्याची मोटरसायकल घेऊन पळून गेला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून, आरोपी बसय्या लिंगनूरचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. तसेच, पार्टीत सहभागी झालेले इतर मित्र आणि कुटुंबीयांचीही चौकशी सुरू आहे असे पोलीस अधीक्षक सिद्धार्थ गोयल यांनी सांगितले.

Tags: