Belagavi

बेळगावात जिल्हास्तरीय शिक्षक दिन उत्साहात साजरा

Share

बेळगावातील गरीब विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण देण्यासाठी सरकारी सरदार शाळा ५ कोटी रुपयांच्या निधीतून विकसित केली जाईल. तसेच, शहरात १० कोटी रुपये खर्चून नवीन क्रीडांगण उभारले जाईल, अशी घोषणा बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी केली.

बेळगाव जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, उपसंचालक कार्यालय शालेय शिक्षण विभाग आणि क्षेत्र शिक्षण अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने बेळगाव शहरातील कुमार गंधर्व कला मंदिरात जिल्हास्तरीय शिक्षक दिन आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले मंत्री सतीश जारकीहोळी यांनी आदर्श शिक्षक, उत्कृष्ट सेवा देणारे शिक्षक आणि सेवानिवृत्त शिक्षकांचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन दिले.

यावेळी बोलताना मंत्री जारकीहोळी म्हणाले की, “सरकारी शाळेतील शिक्षकांनी केवळ अध्यापनाचे कार्य केले नाही, तर शाळांचा विकास, स्वच्छता आणि जनजागृतीसाठीही अनेक उपक्रम राबवले आहेत.” “खासगी शाळांपेक्षा सरकारी शाळा चांगल्या आहेत, असा विश्वास निर्माण करण्यासाठी शिक्षकांनी चांगली सेवा दिली पाहिजे. पूर्वी सरकारी आणि खासगी शाळांमध्ये फरक दिसून येत होता. मात्र, आज सरकारी शाळेत शिकलेले अनेक विद्यार्थी उच्च पदांवर कार्यरत आहेत,” असेही त्यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले की, सरकार शाळांमध्ये शिक्षकांची नियुक्ती करण्यासाठी काम करत आहे.

“दुर्गम भागातील खानापूर तालुक्यातही शिक्षणाला प्राधान्य दिले जात आहे. ५ कोटी रुपयांच्या निधीतून कन्नड, मराठी आणि उर्दू माध्यमांच्या नवीन शाळा बांधल्या जात आहेत,” असेही त्यांनी सांगितले. तसेच, “सरकारी सरदार शिक्षण संस्थाही ५ कोटी रुपयांच्या निधीतून विकसित केली जाईल,” असे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले.

यावेळी विविध मठाधिपती, उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ सेठ, जिल्हा शिक्षण उपसंचालक , सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

Tags: