मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाला अखेर यश मिळाले आहे. राज्य सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्यानंतर बेळगावातील सकल मराठा समाजाने हा निर्णय साजरा करत विजयोत्सव साजरा केला. या आनंदोत्सवादरम्यान मिठाई वाटप करण्यात आली आणि फटाक्यांची जोरदार आतषबाजी झाली. या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी धर्मवीर संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रविवारी बेळगावात भव्य मूक मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर सोमवारी बेळगावातील मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबईत जाऊन जरांगे-पाटील यांची भेट घेऊन पाठिंब्याचे पत्र दिले होते.

यावेळी बोलताना माजी महापौर मालोजी अष्टेकर म्हणाले, “मनोज जरांगे-पाटील यांच्या लढ्यामुळे केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरातील मराठा समाजाला आनंद झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही आरक्षणासाठी प्रयत्न करत आहोत आणि आज त्याला काही प्रमाणात यश मिळाले आहे. या यशाचा आनंद साजरा करत असताना, या लढ्यात ज्यांनी बलिदान दिले त्यांचे स्मरण करणेही महत्त्वाचे आहे.” बेळगावच्या मराठा आणि कुणबी समाजाचीही गॅझेट्समध्ये नोंद असल्याचा उल्लेख त्यांनी केला.
यावेळी बोलताना प्रकाश मरगाळे म्हणाले, “मनोज जरांगे-पाटील यांच्या लढ्याला यश मिळाले आहे. आजवर अनेक आंदोलने यशस्वी झाली नाहीत, पण जरांगे-पाटील यांच्या संघर्षाला यश मिळाले. बेळगावातील ४०,००० कुणबी मराठा समाजाची सातारच्या गॅझेटमध्ये नोंद आहे. आता पुढील मागण्या मान्य होण्यासाठी विधानसभा आणि लोकसभा अधिवेशनात प्रयत्न करणे गरजेचे आहे.”
यावेळी रमाकांत कोंडुसकर, रणजित चव्हाण पाटील, मल्लेश चौगुले, गुणवंत पाटील, शिवराज पाटील यांच्यासह सकल मराठा समाजाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments