Vijayapura

विजापूरमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना

Share

विजापूर शहरात समाजाला लाजवेल अशी एक धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. अवघ्या पाच वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच पित्याने लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे.

या घृणास्पद घटनेने संपूर्ण जिल्ह्याला धक्का बसला आहे. मुलांच्या संरक्षणासाठी आई-वडील हेच सर्वात सुरक्षित आश्रयस्थान मानले जातात, परंतु येथे एका नराधम पित्याने आपल्या मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, ही बाब समाजासाठी अत्यंत शरमेची आहे. पीडित मुलीने घडलेली घटना आपल्या आईला सांगितली. त्यानंतर आईने तात्काळ महिला पोलीस ठाण्यात संपर्क साधून अधिकृत तक्रार दाखल केली.

तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी पित्याला अटक केली. सध्या पीडित मुलीला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिच्यावर आवश्यक वैद्यकीय उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी मुलीची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले आहे. या प्रकरणी विजापूर महिला पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. अशा घटनांमुळे आपला समाज कोणत्या दिशेने जात आहे, याबद्दल चिंता व्यक्त होत आहे.

Tags: