बेळगाव शहरातील उद्योगांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना समस्यांवर वेळेत तोडगा काढण्याचे कडक निर्देश दिले. फाउंड्री क्लस्टरच्या सभागृहात झालेल्या या बैठकीत औद्योगिक समस्या, सिंगल विंडो सिस्टिम, सीएसआर निधी, कौशल्य विकास, पंतप्रधान विश्वकर्मा योजना आणि प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.

विशेषतः, औद्योगिक क्षेत्रातील समस्यांवर महानगरपालिकेच्या हलगर्जीपणाबाबत बैठकीत तीव्र आक्षेप नोंदवण्यात आला. सततच्या वीजपुरवठ्यातील व्यत्ययामुळे होत असलेल्या नुकसानीबद्दल उद्योजकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यावर गंभीर चर्चा करून जिल्हाधिकाऱ्यांनी दोन फिडर लाइन बदलण्याचे आणि आवश्यक ठिकाणी ट्रान्सफॉर्मर बसवण्याचे निर्देश दिले. तसेच, औद्योगिक क्षेत्रातील पथदिव्यांची योग्य देखभाल होत नसल्याची तक्रारही करण्यात आली. या तक्रारींची दखल घेत, १५ सप्टेंबर रोजी पुन्हा बैठक घेऊन कामाच्या प्रगतीचा आढावा घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
ई-खात्याशी संबंधित समस्यांवर सरकारने तातडीने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली. यामुळे उद्योजकांना अनेक अडचणी येत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. औद्योगिक वसाहतींमधील कचरा व्यवस्थापन योग्य प्रकारे व्हावे, सांडपाणी साचू नये आणि गटारांची नियमित साफसफाई व्हावी, अशी मागणीही उद्योजकांनी केली. यावेळी, करप्रणालीबाबत महानगरपालिकेने स्पष्ट निर्णय घ्यावा आणि नियमांविषयी स्पष्टता आणावी, अशी विनंती करण्यात आली. तसेच, व्यापार परवान्याबाबतही (ट्रेड लायसन्स) गोंधळ होत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले.
कर्नाटक स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे स्टॉकयार्ड आणि कणबर्गी इंडस्ट्रियल इस्टेटच्या हस्तांतरणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करून त्यानंतरच करवसुली सुरू करावी, असे निर्देश देण्यात आले. बेळगावच्या उत्तर भागात अग्निशमन दलासाठी जागा निश्चित करण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
होनगा औद्योगिक वसाहतीतून थेट महामार्गावर येणाऱ्या वाहनांमुळे अपघात होत असल्याने, तेथे गतिरोधक (हंप्स) बसवावेत आणि वाहने सर्विस रोडवरूनच महामार्गावर येतील याची खात्री करावी, अशा सूचना प्रोबेशनरी आयएएस अधिकारी अभिनव जैन यांना देण्यात आल्या. तसेच, कणगला औद्योगिक वसाहतीसाठी भुयारी मार्ग (अंडरपास) तयार करण्याचे निर्देश देण्यात आले.
बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजने उद्योजकांच्या समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. सर्व समस्यांवर वेळेत तोडगा काढण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. नेहमी जिल्हाधिकारी कार्यालयात होणारी बैठक औद्योगिक परिसरात घेतल्याबद्दल आणि समस्यांची गंभीर दखल घेतल्याबद्दल बीसीसीआयतर्फे जिल्हाधिकाऱ्यांचे आभार मानण्यात आले. या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, शहर विकास प्राधिकरणाचे आयुक्त शकिल अहमद, महानगरपालिकेच्या आयुक्त शुभा, जिल्हा उद्योग केंद्राचे सहसंचालक सत्यनारायण भट, प्रोबेशनरी आयएएस अधिकारी अभिनव जैन, बीसीसीआयचे अध्यक्ष प्रभाकर नागरमुनोळी, सचिव सतीश कुलकर्णी आणि इतर विविध औद्योगिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.


Recent Comments