Belagavi

बेळगावात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बाळंतिणीचा मृत्यू?

Share

बेळगाव मधील वंटमूरी येथील माता आणि बाल आरोग्य केंद्रात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका बाळंतिणीचा मृत्यू झाल्याचा आरोप करत, तिच्या नातेवाईकांनी नवजात बाळासह रुग्णालयासमोर आंदोलन केले.

मयत निकिता मलिक मादर (२३) यांना काल सकाळी १० च्या सुमारास प्रसूती वेदनांमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सायंकाळी ८ च्या सुमारास सिझेरियन पद्धतीने त्यांनी एका गोंडस मुलीला जन्म दिला. मात्र, त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली. असे असतानाही डॉक्टरांनी याबाबत नातेवाईकांना कोणतीही माहिती दिली नाही, त्यामुळे निकिताचा मृत्यू झाला, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. रुग्णालयासमोर मृत महिलेच्या कुटुंबाच्या आक्रोशाने वातावरण शोकाकुल झाले होते.

या घटनेवर मृत महिलेच्या आईने आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘आमची मुलगी घरातून व्यवस्थित आली होती. सिझेरियन होऊन दोन तास झाले तरी आम्हाला कोणतीही माहिती देण्यात आली नाही. या हलगर्जीपणासाठी जबाबदार असलेल्या डॉक्टरांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. प्रकृती बिघडून तिचा मृत्यू झाला, तरीही पोलीस येईपर्यंत आम्हाला का कळवले नाही,’ अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.

तर, मृत महिलेची बहीण राजेश्वरी ऐहोळे यांनीही आपला संताप व्यक्त केला. ‘आम्ही आधीपासूनच रुग्णालयात होतो, तरीही डॉक्टरांनी आम्हाला व्यवस्थित प्रतिसाद दिला नाही. आम्ही कितीही विचारले तरी त्यांनी काहीच माहिती दिली नाही. डिलिव्हरी होऊन दोन तास झाले तरी आम्हाला काहीच कळवण्यात आले नाही,’ असे त्यांनी सांगितले. याप्रकरणी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश यांनी प्रतिक्रिया दिली. ‘या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन केली जाईल आणि त्यात काही त्रुटी आढळल्यास दोषींवर कठोर कारवाई केली जाईल,’ असे त्यांनी सांगितले. ही घटना माळमारुती पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

Tags: