अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या मैदानावर गोमटेश विद्यापीठाने आयोजित केलेल्या टिळकवाडी माध्यमिक विभागीय मुला-मुलींच्या हँडबॉल स्पर्धेत संत मीरा आणि बालिका आदर्श शाळेने विजेतेपद पटकावले. मुलांच्या गटाच्या अंतिम सामन्यात संत मीरा शाळेने जी. जी. चिटणीस शाळेचा पेनाल्टी शूटआउटमध्ये ८-६ असा पराभव केला. मुलींच्या गटाच्या अंतिम सामन्यात बालिका आदर्श शाळेने संत मीरा शाळेचा ५-४ असा पराभव करून विजेतेपदावर नाव कोरले.

स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाला प्रमुख पाहुण्या म्हणून संत मीरा शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार आणि उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते विजेत्या संघांना चषक आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. यावेळी स्पर्धा संयोजक सचिव अशोक मुन्नोळी, जयसिंग धनाजी, देवेंद्र कुडची, टिळकवाडी शारीरिक शिक्षक संघटनेचे सचिव प्रवीण पाटील, रामलिंग परीट, अर्जुन भेकने यांच्यासह पंच उमेश मजुकर, यश पाटील, शिवकुमार सुतार, यश सुतार, हनमंत अडोनी, समीक्षा बुद्रुक, चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते.


Recent Comments