सध्या कर्नाटकचे काँग्रेस सरकार एकापाठोपाठ एक वादात सापडत आहे. एकीकडे आमदारांचा असंतोष आणि अनुदानांवरून जाहीर नाराजी समोर येत असतानाच, आता खुद्द मंत्री शिवानंद पाटील यांनी आपल्याच सरकारविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, त्यांनी माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांची स्तुती केल्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटले आहे.

विजापूर येथे गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन बोलताना मंत्री शिवानंद पाटील यांनी कुमारस्वामी यांची प्रशंसा केली, तर सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाच्या मुद्द्यावरून आपल्याच सरकारला धारेवर धरले. “पीपीपी (पब्लिक-प्रायव्हेट-पार्टनरशिप) मॉडेलचा वैद्यकीय महाविद्यालय स्थापनेचा प्रस्ताव सरकारने त्वरित मागे घ्यावा. कोणत्या उद्देशाने हा प्रस्ताव आणला आहे, हे मला कळत नाही. सरकारच्या या निर्णयामुळे मला दुःख झाले आहे. पीपीपी मॉडेलचे वैद्यकीय महाविद्यालय कोणासाठी आहे?” असा थेट सवाल त्यांनी विचारला. निवडणूक जाहीरनाम्यात आम्ही सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाचे आश्वासन दिले होते. मग आता पीपीपी मॉडेल का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. “याआधी मी आरोग्यमंत्री असताना जिल्हा रुग्णालयाचा विकास केला होता. एमसीएचसह अनेक विकासकामे केली. देशातील सर्वोत्तम सरकारी रुग्णालयांपैकी विजापूरचे जिल्हा रुग्णालय होते. मी सुरू केलेल्या अनेक इमारतींचे अजूनही उद्घाटन झालेले नाही. माझ्या नावामुळे त्याचे उद्घाटन थांबले असावे,” अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली. “याआधीही जिल्ह्यातील मंत्री आणि आमदारांनी मला सहकार्य केले नाही,” असे म्हणत त्यांनी आपला असंतोष व्यक्त केला.
याचवेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांची प्रशंसा केली. कुमारस्वामी मुख्यमंत्री असताना त्यांनी विजापूर जिल्हा रुग्णालयाच्या विकासासाठी मदत केली होती, असे त्यांनी सांगितले. यातून त्यांनी अप्रत्यक्षपणे विजापूर जिल्ह्याचे पालकमंत्री एम. बी. पाटील आणि आपल्या सरकारवर नाराजी व्यक्त केली. यापूर्वीही एम. बी. पाटील आणि शिवानंद पाटील यांच्यात धुसफूस झाल्याचे पाहायला मिळाले आहे. आता पुन्हा एकदा रुग्णालयाचा आणि वैद्यकीय महाविद्यालयाचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी एम. बी. पाटील यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे.
एकंदरीत, पीपीपी मॉडेलवरील वैद्यकीय महाविद्यालयावरून विजापूरमधील दोन मंत्र्यांमधील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. या प्रकरणामुळे जिल्ह्याच्या राजकारणात असंतोषाची ठिणगी पडली असून, वातावरण तापले आहे.


Recent Comments