जय किसान या खासगी भाजी मार्केटला बंद करू नये, या मागणीसाठी शेतकरी संघटना आणि कर्नाटक युवा रक्षण वेदिकेच्या पदाधिकाऱ्यांनी बेळगावात आंदोलन केले. बेळगाव परिसरात भाजीपाला पिकवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी जय किसान खासगी भाजी मार्केट खूप उपयुक्त ठरत आहे. या मार्केटमुळे वाहतुकीचा खर्च कमी होतो, वेळेवर पैसे मिळतात आणि वजनात कोणतीही फसवणूक होत नाही. त्यामुळे हे मार्केट सुरू राहणे आवश्यक असल्याचे शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर सांगितले.

जय किसान मार्केट बंद झाल्यास शेतकऱ्यांना एपीएमसी मार्केटमध्ये जावे लागेल. त्यामुळे वाहतुकीचा खर्च दुप्पट होईल. तसेच, एपीएमसीमधील व्यापारी ८ ते १५ टक्के कमिशन वसूल करतात, ज्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते. रविवार् पेठेतील लसूण मार्केटसुद्धा जय किसान भाजी मार्केटमध्येच स्थलांतरित करावे. खासगी मार्केटमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचा आरोप चुकीचा असून, अधिकाऱ्यांनी येऊन एकदा तपासणी करावी, असे आवाहनही शेतकऱ्यांनी केले. एपीएमसी शेतकऱ्यांसाठी दूर असून खासगी मार्केटमध्ये उत्पन्नाची योग्य किंमत मिळते. दोन्ही मार्केट सुरू असाव्यात, अशी भूमिका त्यांनी मांडली. ‘खासगी मार्केट बंद केल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल’, अशी प्रतिक्रिया एका शेतकऱ्याने दिली.
यावेळी शेतकरी संघटना आणि कर्नाटक युवा रक्षण वेदिकेचे अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments