महाराष्ट्राप्रमाणेच बेळगावातही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शहराच्या याच भव्य परंपरेला बेळगावातील शहापूर येथील बॅरिस्टर नाथ पै चौक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ एका वेगळ्या पद्धतीने पुढे नेत आहे. या वर्षी बॅरिस्टर नाथ पै चौक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आपला सुवर्णमहोत्सव साजरा करत आहे. याच भागातील प्रसिद्ध ‘संगीता स्वीट्स’नेही आपल्या ५१ व्या वर्षात पदार्पण केले असून सुवर्णमहोत्सवाच्या निमित्ताने मंडळाने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले आहे. गुरुवारी (२८ ऑगस्ट) संध्याकाळी गरीब वृद्धांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले, तर शुक्रवारी सकाळी पंडित नेहरू हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरित करण्यात आले.

या सुवर्णमहोत्सवानिमित्त मंडळाने यंदा ‘नमामि गंगे’ या संकल्पनेवर आधारित काशी विश्वनाथाची भव्य प्रतिकृती तयार केली आहे. या माध्यमातून जलप्रदूषणाबद्दल सामाजिक संदेश देण्यात आला आहे. रविवार दि २४ ऑगस्ट रोजी प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय आणि कंकणवाडी आयुर्वेदिक कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिरही आयोजित करण्यात आले होते. समाजसेविका सुषमा पाटील यांच्या सहकार्याने गुरुवारी वृद्धांना ब्लँकेट आणि शुक्रवारी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटण्यात आले.
यावेळी हेस्कॉमचे कार्यकारी अभियंता अश्विन शिंदे, शहापूर विभागाचे हेस्कॉम अधिकारी शिवानंद गळगळी, समाजसेवक विल्सन वेगास, ब्रह्मकुमारी शहापूर केंद्राच्या प्रमुख मीनाक्षी बहन, अन्नपूर्णा बहन, पूजा पाटील यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
मंडळाचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील, उपाध्यक्ष सचिन रंगरेज, कार्याध्यक्ष परशुराम घाडी, प्रदीप मजुकर, नागेश शिंदे, सदानंद अरुंडेकर, शंकर चव्हाण, लक्ष्मण छत्रणवार, अण्णाप्पा मुगळीकर, सदानंद कदम, हिरालाल चव्हाण, श्रीकांत काकतीकर आणि इतर पदाधिकारी व सदस्य या कार्यक्रमाला उपस्थित होते.


Recent Comments