Belagavi

काँग्रेसमध्येही तयार होणार एकनाथ शिंदे : खासदार जगदीश शेट्टर

Share

काँग्रेस नेत्यांनाही आरएसएसबद्दल चांगली भावना आहे. पण मतपेटीच्या राजकारणासाठी ते आरएसएसला विरोध करतात. काँग्रेस सरकारमध्येही कोणीतरी एकनाथ शिंदे होऊ शकतो, असे भाकीत खासदार जगदीश शेट्टर यांनी केले आहे. बेळगावात पत्रकार परिषद घेऊन ते बोलत होते. “आरएसएस ही संस्था हिंदू समाजाला एकत्र आणण्याचे आणि भारतीय संस्कृतीचे जतन करण्याचे काम करते. काँग्रेस नेत्यांना आरएसएसबद्दल आदर असला, तरी मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्यासाठी ते आरएसएसचा विरोध करतात. हाच दृष्टिकोन डी.के. शिवकुमार यांच्या आर.एस.एस. गीताच्या वक्तव्यातून दिसून आला. ते केवळ माफी मागतात, परंतु आपले विधान मागे घेत नाहीत, यावरूनच हे स्पष्ट होते. मतपेटीच्या या राजकारणामुळेच काँग्रेसने देशात आपली ओळख गमावली आहे. विकासाकडे लक्ष न देता, केवळ व्होट बँकचे राजकारण करत असल्याने भविष्यात त्यांना अल्पसंख्याकांचाही विश्वास गमवावा लागेल,” असे शेट्टर म्हणाले.

पुढे बोलताना ते म्हणाले, “मुख्यमंत्रीपदासाठी सिद्धरामय्या आणि डी.के. शिवकुमार यांच्यात अंतर्गत संघर्ष सुरू आहे. या वादामुळे काँग्रेस सरकार कोणत्याही क्षणी कोसळू शकते. सरकार पाडण्याचा भाजपाचा कोणताही प्रयत्न नाही. आम्ही त्यांना कोणतीही ऑफर दिलेली नाही. त्यांच्यातीलच कोणीतरी एकनाथ शिंदे होऊ शकतो.”

धर्मस्थळातील घटनेत भाजपाचा कट असल्याच्या काँग्रेसच्या आरोपावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, “यामध्ये भाजपाचा कोणताही सहभाग असता, तर तो आतापर्यंत समोर आला असता. एसआयटी झोपलेली आहे का? विनाकारण धर्मस्थळाची बदनामी करणे योग्य नाही.” बुकर पारितोषिक विजेत्या भानु मुश्ताक यांना राज्योत्सवाचे उद्घाटन करण्यासाठी विरोध होत असल्याबद्दल विचारले असता ते म्हणाले, “कन्नड साहित्य संमेलनात भानु मुश्ताक यांनी कन्नड आणि कन्नड भाषेबद्दल केलेल्या विधानामुळे त्यांना विरोध होत आहे. याउलट, निसार अहमद यांची भूमिका कधीही वादग्रस्त नव्हती.” अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

Tags: