Vijayapura

पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे दोन तुकडे करून विहिरीत फेकले

Share

विजापूर जिल्ह्याच्या सिंदगी तालुक्यातील गणीहार गावात एका पतीने आपल्या पत्नीची निर्घृण हत्या करून तिच्या मृतदेहाचे दोन तुकडे केले आणि ते विहिरीत फेकून तो फरार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

नीलम आनगोंड (वय 46) असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, पतीने धारदार शस्त्राने भोसकून नीलमची हत्या केली. शेतात मक्याच्या पिकाला डुकरांचा त्रास होऊ नये म्हणून फटाके वाजवण्यासाठी नीलम गेली होती. त्यावेळी तिचा पती परमानंद तिच्या मागे गेला आणि त्याने तिची हत्या केली. घरातील सर्व सदस्य झोपलेले असताना ही घटना घडली. हत्या केल्यानंतर परमानंदने मृतदेहाचे दोन तुकडे करून ते विहिरीत फेकले. या हत्येमागील नेमकं कारण अद्याप समोर आलेले नाही.

दुसऱ्या दिवशी सकाळी मुलगा आपल्या आईचा शोध घेत असताना त्याला विहिरीच्या काठावर रक्ताचे डाग दिसले. त्याने विहिरीत पाहिले असता त्याला शरीराचा अर्धा भाग आढळला. दुसऱ्या अर्ध्या भागाचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी सिंदगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. “एका महिलेला अर्धविवस्त्र करून तिच्या मृतदेहाचे दोन तुकडे करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी तातडीने अटक करावी. अशा प्रकारच्या घटना संपूर्ण मानवतेला लाजिरवाणे आहेत. पोलिसांनी या क्रूर हत्येचा तपास करून अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कठोर कारवाई करावी,” अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते संगमेश सागर यांनी प्रसारमाध्यमांद्वारे केली आहे.

Tags: