Belagavi

के-सेट परीक्षेतून मराठी विषय वगळल्याने म. ए. युवा समिती आक्रमक

Share

कर्नाटक परीक्षा प्राधिकरणाच्या ‘के-सेट’ परीक्षेतून मराठी विषय वगळल्यामुळे या विषयाची तयारी केलेल्या हजारो विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे. यामुळे, के-सेट परीक्षेतून मराठी विषय वगळू नये, अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने एका निवेदनाद्वारे कर्नाटक प्राधिकरणाचे कार्यकारी संचालक एच. प्रसन्ना यांच्याकडे केली आहे.

महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने अध्यक्ष अंकुश केसरकर आणि सेक्रेटरी श्रीकांत कदम यांच्या नेतृत्वाखाली आज सोमवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. या निवेदनातून एच. प्रसन्ना यांच्याकडे सदर मागणी पाठवण्याची विनंती करण्यात आली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकांनी निवेदनाची तात्काळ दखल घेऊन त्यावर पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. कर्नाटक परीक्षा प्राधिकरणाने ‘कर्नाटक राज्य सहाय्यक प्राध्यापक पात्रता परीक्षा (के-सेट 2025)’ 2 नोव्हेंबर 2025 रोजी घेण्याचे निश्चित केले आहे. या परीक्षेसाठी 28 ऑगस्टपासून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. या वर्षीच्या परीक्षेसाठी बेळगावला केंद्र म्हणूनही नियुक्त करण्यात आले आहे. मात्र, यंदाच्या 33 विषयांच्या यादीतून मराठी विषय वगळण्यात आला आहे. मागील वर्षीच्या परीक्षेत मराठीचा समावेश होता, पण यावर्षी इतिहास, समाजशास्त्र, भूगोल, हिंदी, शिक्षण, समाजकार्य, कायदा, शारीरिक शिक्षण, गृहविज्ञान, संगीत यांसारखे विषय असूनही मराठीचा समावेश करण्यात आलेला नाही, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

Tags: