Belagavi

अपघातग्रस्त पीडित कुटुंबाला ‘लक्ष्मीताई फाऊंडेशन’ची मदत

Share

भीषण रस्ता अपघातात दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने बेळगावमधील बेळवट्टी गावातील एका कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ही दुर्दैवी घटना कळताच महिला आणि बाल विकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी रविवारी पीडित कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

बेळगाव जिल्ह्यातील बेळवट्टी येथील रोहिणी रामलिंग चौगुले या तरुणीचा काही दिवसांपूर्वी कार आणि दुचाकीच्या भीषण अपघातात गंभीर जखमी होऊन दुर्दैवी अंत झाला होता. या अपघातात रोहिणीची आई आणि मामादेखील जखमी झाले होते. दुर्दैवाने उपचारादरम्यान मामाचाही मृत्यू झाला, तर आईवर अजूनही रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी रविवारी त्यांच्या निवासस्थानी भेट दिली. ”लहान वयातच रोहिणीने जगाचा निरोप घेतला ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. या दुःखाच्या प्रसंगी मी तुमच्यासोबत आहे”, असे म्हणत मंत्री हेब्बाळकर यांनी कुटुंबीयांना धीर दिला. तसेच, गरिबीत जीवन जगणाऱ्या या कुटुंबाला ‘लक्ष्मीताई फाऊंडेशन’ च्या वतीने त्यांनी थोडी आर्थिक मदतही केली.

Tags: