Belagavi

कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी काकती ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव

Share

भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने जारी केलेला आदेश केवळ शहरी भागापुरता मर्यादित न ठेवता ग्रामीण भागासाठीही लागू करावा, अशी मागणी करत संतप्त काकती गावातील नागरिकांनी बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले. आज बेळगावात जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात आलेल्या काकती गावातील नागरिकांनी भटक्या कुत्र्यांचा उपद्रव थांबवण्याची मागणी केली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई करावी, असे आवाहन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केले.

यावेळी बोलताना काही गावकऱ्यांनी सांगितले की, गावात कुत्र्यांची दहशत वाढली असून, महिला आणि मुले निर्भयपणे फिरू शकत नाहीत. कुत्री लहान मुले, महिला, वृद्ध आणि जनावरांवरही हल्ले करत आहेत. याविषयी काकती ग्रामपंचायत आणि जिल्हा पंचायतीकडेही तक्रार करण्यात आली आहे, पण अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.

‘काकती गावात भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक वेळा ग्रामपंचायत आणि जिल्हा पंचायतीच्या निदर्शनास ही गोष्ट आणली आहे, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. लहान मुले शाळेत जाताना त्यांच्यावर जेवणाचा डबा हिसकावून घेण्यासाठी हल्ला केला जातो. पहाटे फिरायला गेलेल्या वृद्धांवरही कुत्रे कळपाने हल्ला करतात. गावात जवळपास २० लोकांना कुत्र्यांनी चावले आहे,’ अशी माहिती ग्रामपंचायत सदस्य गजानन गव्हाणे यांनी दिली. ते पुढे म्हणाले की, ‘भटक्या कुत्र्यांबाबत उच्च न्यायालयाने जारी केलेला आदेश केवळ शहरापुरता मर्यादित न ठेवता, तो ग्रामीण भागासाठीही लागू करावा.’

यावेळी आशिष गव्हाणे, राजाराम इंजळ, गुरु पिसे, गौस साणवाले, मोहम्मद सरफराज, झैना हन्नूरी, फातिमा मोमिन, सेहरा मोमिन, अस्मा चौधरी, सानिया गौंडी, शबाना साणवाले यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

Tags: