Belagavi

पांगुळ गल्लीत रस्त्यावर व्यावसायिकांचे स्टॉल्स, वाहतूक कोंडी आणि वादावादी

Share

गणेशोत्सव अवघ्या आठ दिवसांवर आल्याने बेळगाव शहरातील पांगुळ गल्ली परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. येथील रस्त्यावर व्यावसायिकांनी स्टॉल थाटल्याने रस्त्यावरून नागरिकांना चालणे देखील कठीण झाले आहे.

आज चार दिवसांनंतर पावसाने उघडीप दिल्याने नागरिक खरेदीसाठी मोठ्या संख्येने बाजारपेठेत दाखल झाले. याचा परिणाम म्हणून शहरातील प्रमुख बाजारपेठांपैकी एक असलेल्या पांगुळ गल्लीत वाहनांची मोठी गर्दी झाली. गणेशोत्सवासाठी व्यावसायिकांनी रस्त्यावरच स्टॉल्स मांडले आहेत परिणामी दुचाकी पादचाऱ्यांना या रस्त्यावरून चालणे देखील कठीण झाले आहे. खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली.

पांगुळ गल्ली परिसरात वाहनांची दुतर्फा पार्किंग केली जाते. गणेशोत्सवासाठी तसेच इतर सण-उत्सवांसाठी बेळगावातील आणि परगावातील नागरिक येथे खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. या भागात विविध प्रकारचे सजावटीचे साहित्य आणि सणांसाठी लागणाऱ्या सर्व वस्तू उपलब्ध असल्याने अनेकजण येथे खरेदीला पसंती देतात. रस्ता अरुंद असल्याने आणि दोन्ही बाजूंनी वाहने उभी केल्याने वाहतूक कोंडीची समस्या वारंवार निर्माण होते. येथे मोठ्या प्रमाणात घाऊक विक्रेते असल्याने प्रत्येक दुकानात गर्दी होते, आणि खरेदीसाठी आलेल्या नागरिकांकडून रस्त्याच्या दुतर्फ़ा पार्किंग केली जाते.

उत्सवकाळात येथील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी योग्य व्यवस्था करावी अशी व्यावसायिक आणि नागरिकांनी वाहतूक विभागाकडे मागणी केली आहे.

Tags: