बेळगाव शहरातील वाढत्या चाकू हल्ल्यांच्या घटना लक्षात घेता, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस आयुक्त कार्यालयाच्या सूचनेनुसार संशयित व्यक्तींवर करडी नजर ठेवण्यात येत आहे. याच मोहिमेअंतर्गत मार्केट पोलीस स्टेशनच्या पथकाने एका आरोपीला धारदार शस्त्रासह अटक केली आहे.

मार्केट पोलीस ठाण्याचे पीएसआय विठ्ठल हावनवर यांच्या नेतृत्वाखालील पथक गस्त घालत असताना, बेळगावच्या सुभाषनगर, मराठा कॉलेजसमोरील न्यूमोनिया हॉस्पिटलकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका संशयित व्यक्तीला पाहिले. त्याची झडती घेतली असता, त्याच्याजवळ एका पिशवीत बेकायदेशीररीत्या एक धारदार तलवार आढळून आली. या तलवारीसह त्याला ताब्यात घेण्यात आले. आरोपीचे नाव जुबेर अब्दुलवहाब शेख (वय ३६, रा. ६ वी क्रॉस, आझाद नगर, बेळगाव) असे आहे. मार्केट पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध केपी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.
या कारवाईत पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक धारदार तलवार जप्त केली आहे. या यशस्वी कामगिरीबद्दल बेळगाव शहर पोलीस आयुक्त आणि डीसीपी यांनी पीएसआय आणि त्यांच्या पथकाचे कौतुक केले आहे.


Recent Comments