धारवाड जिल्ह्यात सध्या मूग पीक कापणीला आले आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या तोंडात आलेला घास हिरावला गेला असून, त्यांची अवस्था बिकट झाली आहे.

गेल्या तीन-चार दिवसांपासून धारवाड जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे कापणीला आलेल्या मुगाला जागेवरच कोंब फुटू लागले आहेत. कापणीला आलेल्या मुगाचे पीक हातातून गेल्याने शेतकरी मोठ्या चिंतेत आहे. धारवाड जिल्ह्यात खरीप हंगामात मूग, उडीद, सोयाबीन आणि शेंगदाणा ही पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. सध्या मूग पीक कापणीला आले आहे, पण हा पाऊस शेतकऱ्याला शेतात जाऊ देत नाहीये. ‘पाऊस येऊनही नुकसान आणि जाऊनही नुकसान’ अशी शेतकऱ्याची अवस्था झाली आहे.
उडीद पीकही १५ दिवसांत कापणीला येईल. काही ठिकाणी ते वाळू लागले होते, पण या पावसामुळे त्यालाही मोठा फटका बसला आहे. सध्या शेंगदाणा पिकाला सूर्यप्रकाशाची गरज होती, पण पीक पाण्याखाली गेल्याने तेही खराब होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये मूग कापणीला आले असतानाही ते पीक हातातून गेल्याने शेतकरी डोक्याला हात लावून बसला आहे, हे नक्की.


Recent Comments