‘बेळगावचा राजा’ अशी ओळख असलेल्या चव्हाट गल्लीतील श्री गणेश मूर्तीचा आगमन सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला. बेळगाव शहराच्या जुन्या गल्ल्यांपैकी एक असलेल्या या ठिकाणी ‘बेळगावचा राजा’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री गणेशाच्या आगमन सोहळ्यासाठी प्रचंड उत्साह दिसून आला.

गणपतीचे पहिले दर्शन घेण्यासाठी बेळगाव शहर तसेच ग्रामीण भागातून हजारो भाविकांनी गर्दी केली होती. छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज चौकातून या भव्य मिरवणुकीला सुरुवात झाली. १८ फूट उंच असलेली श्री गणेशाची भव्य आणि सुंदर मूर्ती तसेच त्या आकर्षक डोळ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ढोल-ताशांच्या गजरात आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात परिसर दुमदुमून गेला होता.
यावेळी पोलीस अधीक्षक नारायण भरमणी, माजी आमदार अनिल बेनके, भाजप नेते मुरुगेंद्रगौडा पाटील, सामाजिक कार्यकर्ते श्लोक राजू कडोलकर, रोहित रावल यांनी गणेशाची पहिली पूजा केली. माजी आमदार अनिल बेनके यांनी ‘चव्हाट गल्ली’तील गणपतीच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीबद्दल माहिती दिली.
या सोहळ्यादरम्यान भाजप नेते मुरुगेंद्रगौडा पाटील यांनी ‘बेळगावचा राजा’चा आगमन सोहळा आणि शहरातील गणेशोत्सव खूप प्रसिद्ध असल्याचे सांगितले.
मंडळाचे अध्यक्ष श्रीनाथ पवार यांनी ‘बेळगावचा राजा’च्या आगमन सोहळ्याची आणि इतर धार्मिक कार्यक्रमांची माहिती ‘इन न्यूज’ला दिली.
यावेळी कार्यकारी अध्यक्ष सुनील जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने गणेशभक्त उपस्थित होते.


Recent Comments