विजापूर जिल्ह्यात अलीकडेच झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले. अनेक भागात पावसामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. या परिस्थितीमुळे संतप्त झालेल्या लोकांनी महानगरपालिका आणि लोकप्रतिनिधींविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त करत रात्री उशिरापर्यंत निदर्शने केली होती. या पार्श्वभूमीवर, मंत्री एम.बी. पाटील यांनी शहरातील पूरग्रस्त भागांची पाहणी केली.

विजापूर शहरात सलग चार दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे रामनगर, जुम्मा मशीद आणि जमखंडी रोड परिसरामध्ये मोठे नुकसान झाले. या अस्मानी संकटाने लोक हैराण झाले होते. पावसामुळे घरात ठेवलेले धान्य खराब झाले, त्यामुळे त्यांना खायला अन्नही मिळेनासे झाले. अनेक ठिकाणी लोकांनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली आणि महानगरपालिका तसेच लोकप्रतिनिधींविरुद्ध संताप व्यक्त केला. यानंतर, पालकमंत्री एम.बी. पाटील यांनी तातडीने अधिकाऱ्यांची बैठक घेऊन ‘काम करा, नाहीतर घरी जा’, असा इशारा दिला. त्यानंतर त्यांनी स्वतः शहरात फिरून नुकसानीची पाहणी केली आणि अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. काही घरांमध्ये जाऊन त्यांनी परिस्थितीची पाहणी केली.
यावेळी मंत्री एम.बी. पाटील यांनी शिवाजी सर्कल, नवबाग रोड, रामनगर, जुम्मा मशीद, बागायत गल्ली आणि इतर पूरग्रस्त भागांना भेट दिली. त्यांनी अधिकाऱ्यांशी संवाद साधत सांगितले की, ‘येत्या काही दिवसांत आणखी पावसाची शक्यता असल्याने तात्काळ उपाययोजना करा आणि पावसाळ्यानंतर अशा समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी कामे सुरू करा.’ यावेळी महानगरपालिकेचे सदस्य आणि अधिकारी यांनी मंत्र्यांना पुढील उपाययोजनांची माहिती दिली.
या सगळ्या परिस्थितीमुळे आता महानगरपालिकेचे अधिकारी योग्य प्रकारे काम करून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी पावले उचलणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.


Recent Comments